अबाऊट टर्न: स्वप्न

हिमांशू

एक सुंदर, रम्य स्वप्न आहे. स्वप्नात रस्त्यावरून शिस्तीनं धावणारी वाहनं दिसतायत. कुणीही ट्रॅफिक सिग्नल तोडत नाही. सर्वांच्या खिशात लायसेन्स आहे (आणि ते डुप्लिकेट नाही). रस्त्यात दिसणाऱ्या सर्व वाहनांची रितसर नोंदणी झालेली आहे आणि नोंदणीची कागदपत्रं प्रत्येक वाहनचालकाने गाडीच्या डिकीत ठेवलीत. प्रत्येक गाडीचा इन्शुरन्स अद्ययावत आहे. खरं तर कुणी कुणाला धडकणार नाहीच एवढी शिस्त वाहतुकीला लागलेली आहे; पण तरीसुद्धा वेळ सांगून येत नाही म्हणून इन्शुरन्स! कोणीही आपल्या वाहनातून धोकादायक वस्तूंची वाहतूक करत नाहीये. कोणीही सुसाट वाहन चालवत नाहीये. दुचाक्‍यांच्या जाहिरातींमध्ये कितीही स्टंट दाखविले जात असले, तरी एकही तरुण त्याचं अनुकरण करत नाहीये.

जिथे ट्रॅफिक सिग्नल नाही, तिथे वाहतुकीच्या नियमनासाठी पोलीस उभे आहेत आणि मुख्य म्हणजे प्रत्येक वाहनचालक त्यांच्या इशाऱ्यांचं पालन करतोय. प्रत्येक वाहनचालकाकडे प्रदूषण नियंत्रणाचं प्रमाणपत्र अर्थात पीयूसी सर्टिफिकेट आहे. चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट बांधलेले आहेत. दुचाकी किंवा चारचाकी चालवताना कुणीही मोबाइल फोनवर बोलत नाहीये. सर्वच दुचाकी चालकांनी हेल्मेटं घातली आहेत. (मागे बसलेल्या व्यक्‍तींनीसुद्धा!) रस्त्यालगत असलेल्या बारकडे कुणाचंच लक्ष जात नाहीये. आधी सुरक्षित घरी पोहोचू आणि नंतर मूड आलाच तर पायी बारमध्ये येऊ, असा विचार लोक करू लागलेत. अपघातांची, मृतांची आणि जखमींची संख्या खूपच घटलीय…

आहाहाहा! किती सुंदर स्वप्न आहे ना? कुणी म्हणेल, हे दृश्‍य फक्‍त स्वप्नातच दिसू शकतं; प्रत्यक्षात नाही! पण म्हणून काय स्वप्न पाहायचंच नाही? आणि हे स्वप्न आमचं नाहीये. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं हे स्वप्न आहे. त्याचं झालं असं की, गुरुग्राममध्ये एका स्कूटीचालकाला वाहतूक पोलिसांनी पकडलं. अनेक नियमांचं उल्लंघन त्याच्याकडून झालेलं असल्यामुळे त्याला 25 हजारांचा दंड झाला. त्याच्या स्कूटीची किंमत 17 हजार! चालक म्हणाला, पोलिसदादा, स्कूटी ठेवा तुमच्याकडेच! भुवनेश्‍वरमध्ये एक रिक्षावाला वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात असाच सापडला. रिक्षाची किंमत 26 हजार आणि त्याला दंड झाला 47 हजार! असे एक ना दोन, अनेक किस्से घडल्यानंतर ठिकठिकाणी नव्या नियमावलीला विरोध वाढू लागला.

आपल्याकडे नियम कुणालाच नको असतात. मग सरकारने आपली तिजोरी भरण्यासाठी दसपट दंडाची तरतूद केली, असे आरोप होणारच! काही राज्यांनी नवी नियमावली स्वीकारलेली नसली, तरी अनेक राज्यांच्या प्रतिनिधींनी मिळून ती तयार केलेली आहे, असं गडकरींनी सांगितलं. “”एक दिवस असा येईल की, कुणालाच दंड किंवा शिक्षा होणार नाही आणि सगळे लोक वाहतुकीचे नियम पाळतील,” अशा शब्दांत गडकरींनी त्यांचं स्वप्न सांगितलं.

वाहतूक पोलिसाबरोबर “सेटिंग’ करणारी माणसं गडकरींना स्वप्नात दिसली नसतीलच! शिवाय काळा पैसा बाहेर येईल या स्वप्नाखातर केलेल्या नोटाबंदीचं काय झालं, याचंही त्यांना विस्मरण झालं असावं. “”पैशांपेक्षा जीव मौल्यवान आहे,” हे गडकरींचं म्हणणं पटलं; पण रस्त्यांमधल्या खड्ड्यांमुळंही जीव जातो आणि रस्त्यांसाठीही पैसे लागतात, हेही गडकरींना ठाऊक असावं. जीव अनमोल आहे आणि खड्ड्यामुळं तो जाऊ नये म्हणून लोक थेट मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतायत, त्याचं काय?

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×