कामशेत – आधारकार्डशी रेशनकार्ड लिंक करून रेशन वितरित करण्यासाठी पॉस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाडहोत असल्याने नागरिक व रेशन दुकानदार यांच्यात वारंवार वादविवाद होत आहेत. या सततच्या कटकटीला वैतागून तालुक्यातील रेशन दुकानदारांनी पॉस मशिन तालुका पुरवठा शाखेकडे जमा केल्या.
रेशनिंग दुकानांची राज्यातील साखळी ही सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्वात मजबूत व प्रभावी यंत्रणा आहे. अगदी आदिवासी पाड्यावरदेखील या यंत्रणेच्या माध्यमातून धान्य वितरित केले जाते. या वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने रेशन दुकानदारांना पॉस मशिन दिल्या आहेत. रेशनधारकांचे आधारकार्ड लिंक केल्यानंतर, त्यांना याठिकाणी बोटाचा ठसा दिल्याशिवाय रेशन वितरित करू नये, अशा सूचना आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून धान्य वाटप करत असताना यंत्र बिघाड, सर्वरडाऊन, रेंज नसणे, डाटा एन्ट्री लवकर न येणे आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे शिधापत्रिकाधारकांशी निष्कारण वाद होत आहेत. त्यातून कार्डधारकांच्या तक्रारी वाढत आहेत.
याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. परंतु कोणताही कार्यवाही झाली नाही. पॉस मशिन वापरातील अनेक अडचणी व ग्राहकांबरोबर होणाऱ्या वाद-विवादांना वैतागून तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी ही यंत्रे शासनाला परत केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाबुलाल नालबंद, अंकुश आंबेकर, अशोक होगले, लहू सावळे, चंद्रजीत वाघमारे, हिरालाल जैन, दत्तात्रय केदारी, विजय आडकर, काळूराम भोईरकर, दत्तात्रय घोजगे, लक्ष्मण ठाकर, शहाजी कडू, गोपाळ गायकवाड, संगीता गोपाळे, सविता सुराणा आदी उपस्थित होते.