अॅडलेड : अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानने बिग बॅश लीगच्या या हंगामातील शेवटच्या सामन्यात ब्रिस्बेन हीटच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवत अॅडलेड स्ट्रायकर्सकडून निर्धारित चार षटकांत 17 धावांमध्ये, 6 फलंदाजांची शिकार केली. विशेष म्हणजे यातील पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. या कामगिरीसह रशिद खान बिग बॅश लीगच्या एका सामन्यात सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजांमध्ये तिसर्या स्थानी पोहचला.
सनरायझर्स हैदराबादने रशिद खानला करारमुक्त केल्याने 11 ते 13 फेब्रुवारीला होणार्या आयपीएल लीलावत रशिद खानला या कामगिरीमुळे मोठी रक्कम मिळणार यात शंका नाही.
ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर राशिदच्या या कामगिरीच्या जोरावर अॅडलेड स्ट्रायकर्सने 71 धावांनी विजय मिळवला. रशिद त्या पहिल्या षटकात महागडा ठरला होता. ब्रिस्बेन हीटच्या फलंदाजांनी रशिदच्या पहिल्या षटकात 11 धावा केल्या होत्या, पण त्यानंतरच्या तीन षटकांत ब्रस्बेन हीटच्या फलंदाजांना त्याची गोलंदाजी समजली नाही. रशिदने त्याच्या दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या षटकात प्रत्येकी 2 बळी मिळवले. या दरम्यानरशीदला दोनवेळा हॅट्रीक करण्याची संधी होती मात्र त्याला तसे करता आले नाही.
बीबीएलमध्ये एका सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर आहे, त्याने 2012 मध्ये 7 धावांत 6 बळी घेतले होते. यानंतर दुसर्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या ईश सोधीने 2017 मध्ये 11 धावांत 6 बळी मिळवले होते.
या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 161 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीटचा संघ 15 षटकांत 90 धावांवर गारद झाला.