मुंबई – भायखळा (पूर्व) येथील राणी बागेचा (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) 161 वा (Rani baug wardhapandin) वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. विशेष बाब म्हणजे वर्धापनदिनाचे औचित्य साधून राणी बागेतील पेंग्विन (Penguin ) कक्षातील तीन नवीन पिलांचेही नामकरणही करण्यात आले. ‘कोको’, ‘स्टेला’ व ‘जेरी’ अशी या तीन पिलांची नावे ठेवण्यात आली. यामध्ये, ‘कोको’ आणि ‘स्टेला’ मादी असून, ‘जेरी’ हा नर आहे.
राणी बागेतील प्राणीसंग्रहालयामध्ये जगाच्या एकूण सात खंडांपैकी सहा खंडांतील वृक्ष आणि वनस्पती आहेत. त्या वनस्पतींवर आधारित नवीन मालिका ‘सिल्वन फॉरेस्ट’च्या प्रोमो व्हिडिओचे अनावरणही यावेळी करण्यात आले, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
वर्धापन दिनानिमित्त वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील विविध वनस्पतींसह वाळवंटात आढळणाऱ्या प्रजातींच्या झाडाझुडपांचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते.‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेने टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केलेले 15 बेंचेस (आसन व्यवस्था) राणी बाग प्राणिसंग्रहालयास भेट देण्यात आले. प्राणिसंग्रहालयात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांसाठी हे बेंचेस बसविण्यात आले आहेत.
यासह पर्यटकांच्या सुविधेसाठी ‘मनराव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने प्राणिसंग्रहालयास मिळालेल्या 5 व्हिलचेअर्स देखील हस्तांतरित करण्यात आल्या. प्राणिसंग्रहालयातील गांडूळ खत प्रकल्पात काम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांचा खत विक्रीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशासनाकडून सन्मान करण्यात आला.