Randhurandhar Santaji – छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने स्वराज्याची राजधानी ‘रायगड’ किल्ल्यावर पोहोचले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय…. जय भवानी… जय शिवाजी… हर हर महादेव अशा घोषणांनी रायगड किल्ला दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत रायगड किल्ल्यावर, ‘रणधुरंधर संताजी’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले.
‘रणधुरंधर संताजी’ हा चित्रपट नेहादित्य फिल्म्सची निर्मिती असून ‘शुर सरसेनापती संताजी’ या पुस्तकावर आधारित आहे. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे ‘शुर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाचे लेखक असून त्यांच्या या साहित्यकृतीस मराठी साहित्य परिषदेच्या 2022 वर्षातील रा. ना. नातु या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
दरम्यान, नेहादित्य फिल्म्सचे निर्मिती प्रमुख श्रीमंत करण सिंह बांदल यांनी हा चित्रपट सध्या, पूर्व निर्मिती प्रक्रियेत असून दसऱ्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल आणि पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी माहिती दिली.
यावेळी, कुणालराजे मालुसरे, रवींद्र कंक (सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज), हैबतराव शिळीमकर, झुंजारराव मरळ, दीपकराव राजेशिर्के, श्रीमंत करणसिंह नाईक बांदल, अनिकेत कोंडे-देशमुख, शस्त्र अभ्यासक राहुल गोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ( Randhurandhar Santaji )