-->

रानचाफा

“मंदार, अरे ऊठ आता. सूर्य डोक्‍यावर यायची वेळ झाली. सुट्टी आहे म्हणून अंथरुणात कितीही वेळ लोळत पडायचं का? ऊठ लवकर. तुझ्यासाठी गरमागरम थालीपीठ करायला घेतलीत आणि तुला कुमुदच्या घरी पण जायचंय. लताला म्हणावं लोणचं मुरलंय की नाही ते चाखून सांग मला.’
कुमुदचं नाव ऐकताच अंगावरची चादर झटकून देत मंदार ताडकन उठला. डोळे चोळत स्वयंकपाकघरात गेला आणि आईला बिलगला.
“काल रात्री का नाही सांगितलंस?’ “काय?’

“हेच की कुमुदकडे जायचंय.’ फडक्‍यावर थापलेलं थालीपीठ तव्यावर पालथं करत,”कामाच्या गडबडीत राहून गेलं सांगायचं. बरं, घंगाळात गरम पाणी काढून ठेवलंय आंघोळ करून घे. तुझी आंघोळ झाली की लगेच तुला खायला देते’.
“गंगेच यमुनेचे गोदावरी सरस्वती । नर्मदे सिंधु कावेरि जलैस्मिन्‌ संन्निधिं कुरु ।’ मोठमोठ्याने श्‍लोक म्हणत मंदारने स्नान आटोपलं.
“आई, माझा गुलाबी शर्ट कुठे ठेवलास?’ “धुवायला घेतलाय.’ “परवाच धुतला होतास की; मग आज पुन्हा कशाला घेतलास?’ “मळला होता. आणि काय रे; ढीगभर शर्ट असताना त्याच शर्टपाशी काय आडलंय तुझं?

कपाटातला घाल दुसरा एखादा.’ मंदार पायाची आदळआपट करत तावातावात माजघरात गेला आणि कपाटात शर्ट शोधू लागला. “सगळे शर्ट चुरगळलेत. हे असं चुरगळलेला शर्ट घालून जाऊ का कुमुदच्या घरी’ “मंदार, तुझा नाश्‍ता होईपर्यंत मी देते करून कपड्यांना इस्त्री; पण चिडचिड काही करू नकोस.’ “काही नको. जातो मी असाच. कुमुदच्या आईवर तुझंच बॅड इम्प्रेशन पडेल. म्हणतील मुलाच्या अंगावर घालायला नीटनेटके कपडेसुद्धा नाहीत.’
उमा स्वयंपाकघरात एकटीच हसत होती. “नक्‍की कुमुदच्या आईवरच का रे?’

काहीवेळाने मंदार तोंड फुगवून त्याच्या आई समोर येऊन बसला. “हे गरमागरम थालीपीठ आणि ही त्याच्यासोबत दह्याला फोडणी देऊन केलेली चटणी.’
मंदार एक अक्षर न बोलता खाली मान घालून खात होता. “आता हे शेवटचं एकच.’
“नको. पोट भरलंय माझं.’ नको म्हणताना उमाने मंदारच्या ताटात थालीपीठ ठेवलंच.
“माझं सोनुलं गं बाळ ते! लगेच रुसून बसतं.’ म्हणत ती मंदारला गोंजारू लागली.
“काही लाडीगोडी लावू नकोस. आणि तसंही लहान नाही राहिलो मी आता सोनुलं बाळ म्हणायला! कॉलेजला जातो मी आता.’
“चुकलं माझं. इथपासून पुढे तुला विचारल्याशिवाय तुझा तो आवडता शर्ट नाही घेणार धुवायला. मग तर झालं!’
मंदारने सायकल बाहेर काढली. “दे ती बरणी इकडे.’ म्हणत आईच्या हातातली पिशवी घेत पुढे अडकवली.
“लवकर परत ये. नाहीतर मैत्रिणीबरोबर गप्पागोष्टी करताना वेळेचं भान नाही राहायचं.’
गाणं गुणगुणताना त्यावर डोलणारी मान मध्येच आरशासमोर थांबवत मंदारचा हात त्याच्या केसावरून फिरत होता. तर कधी त्याच्या सुरात सायकलची घंटी संगीत देत होती.

“ये मंदार.’
कुणीतरी जोराने आवाज दिला. मंदारने सायकल थांबवली.
“दिन्या, पश्‍या तुम्ही! आणि इथे काय करताय?’ दोघे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.
“पश्‍या, मी तुला म्हणलं होतं मंदारला आपल्या टीममध्ये घेऊ नकोस. आज आपली मॅच आहे विसरलास ना तू?’ दाताखाली जीभ चावत, “हो रे. लक्षातच नाही राहिलं माझ्या. आलोच मी.’ “थांब… थांब… आधी सांग कुठं चाललास’ “त्ये… आईचं काम आहे.’ “चाललास कुठं?’ “कुमुदच्या घरी. लोणचं द्यायला.’ दोघे पुन्हा एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. “म्हणजे आता तू काही लवकर येत नसतो.’ “आलोच.’ असं म्हणत मंदार निघून गेला. “पश्‍या, याची आधीच विकेट पडलीय!’

मंदार फाटक उघडून आत गेला. त्याने दाराची कडी वाजवली. दार उघडताच, “ये आत मंदार. आत्ताच उमाचा फोन येऊन गेला.
कुमुद, तुझा मित्र आलाय बघ.’ कुमुदच्या आईने मंदारला पाणी दिलं. तेवढ्यात कुमुद बाहेर आली. दोघांनी एकमेकांकडे पाहून हसल्यासारखं केलं. “काकू, आईने लोणचं दिलंय.’ “कुमुद, आण गं ती बरणी इकडे.’ मंदारच्या हातून बरणी घेऊन कुमुद आत गेली.
थोड्यावेळाने, “हे घे.’ “खोबऱ्याच्या वड्या! मला जाम आवडतात. तू पण घे ना.’ कुमुदने वाटीतली एक वडी उचलून तोंडात टाकली. “उद्या बाबा येणार म्हणून आईने खास त्यांच्यासाठी करून ठेवल्यात.’ “कुमुद, आणखी घेऊन जा.’ “नको काकू. घरातून निघताना नाश्‍ता केला होता.’ “हो. सांगितलं उमाने. आणि तिच्यावर रागवून आलास वाटतं.’

मंदारने कुमुदकडे पाहिलं. “तसा हा शर्ट सुद्धा छान दिसतो.’ म्हणत कुमुद खाली बघून हसू लागली. “हो का. कुमुद, आपण तलावाकडे जायचं का फिरायला?’ “आईला विचारलं पाहिजे.’ तेवढ्यात कुमुदची आई बाहेर आली. “काय विचारायचंय?’ “आई, मंदार म्हणत होता आपण तलावाकडे फिरायला जायचं का?’ “अगं मग जा; पण लवकर परत ये. रियाज करायचाय विसरू नकोस.’ दोघे तलावाच्या दिशेने निघाले. “कुमुद, इथे बसू या.’ काहीवेळ दोघेही शांत होते. “पुढच्या महिन्यात परीक्षा आहेत. अभ्यास झाला का करून?’ “अं… हो हो. म्हणजे चालू आहे. पण कधीकधी अभ्यासात मनच लागत नाही. पुस्तक हातात घेतलं की समोर…’ मंदारने बाजूचा दगड उचलला आणि तलावात भिरकावला. “एक, दोन, तीन, चार आणि हा पाचवा टप्पा. कुमुद, आज मी पाच टप्पे केले. बघितलंस?’ कुमुद हसून, “हो. आणि तू त्या पाण्यावर पडलेले तरंग पाहिलेस?

एकाच जागी निमूटपणे संचित होऊन आपल्या काठाला भेटण्याची कधीपासूनची ती ओढ आज पूर्ण झाली असेल नाही! आपलंही असंच असतं. एखाद्याला भेटण्याची ओढ लागून राहते या वेड्या मनाला. कधी समोरच्याने व्यक्‍त होऊन आपल्या मनाला स्पर्श केलेला असतो; तर कधी अव्यक्‍त राहून हृदयाला’ तलावात पुन्हा भिरकवायला घेतलेला दगड मंदारच्या हातात तसाच होता. “कुमुद, एवढं चांगलं बोलायला कसं जमतं तुला? तू बोलताना असं वाटतं; ऐकतच राहावं.’ “असं काही नाही. जे मनात आहे तेच ओठांवर येतं.’ “पण सगळ्यांचं असं नसतं. आणि ज्यांचं असतं; त्यांच्याही मनातलं सगळंच ओठांवर येईल असंही नसतं!’ “तू मघाशी काहीतरी सांगत होतास; पुस्तक हातात घेतलं की समोर…’ मंदार कावराबावरा होऊन, “कुठे काय. काही नाही.’

कुमुद खाली बघून गालातल्या गालात हसत होती. “आई म्हणते, माणसानं आतून खरं असावं. स्वतःशी आणि दुसऱ्याशीसुद्धा. आणि तेवढंच शुद्ध देखील; त्या सात स्वरांसारखं!’ “कुमुद, माणूस खरा किंवा शुद्ध असतो का हे माहिती नाही; पण त्याने कुणावरती जीवापाड केलेलं प्रेम मात्र खरं आणि शुद्ध असू शकतं. आणि तेवढंच पवित्र देखील!’ “आणि प्रेम म्हणजे काय मंदार? जे मनात असतं पण ओठावर कधी येत नाही; तेच का?’ “नाही. ओठांवर न येताही एखाद्याच्या मनातलं ओळखता येणं म्हणजे प्रेम! कधी अव्यक्‍त राहून एखाद्याच्या हृदयात घर करून राहणं; म्हणजे प्रेम!’

कुमुद शांत होऊन मंदारचं बोलणं ऐकत होती. “कुमुद, तुला कधी कुणाला भेटायची ओढ नाही लागली?’ मंदारला काय म्हणायचं ते कुमुदला कळत होतं. मंदारच्या प्रश्‍नाने मनावर उठलेले तरंग तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण तिला दोघांच्या नात्यामधली ही अनामिक ओढ अशीच टिकवून ठेवायची होती. “हो.’ “सांग ना मग.’ “सध्यातरी मला रियाजला बसायची ओढ लागलीय. आणि कुणाला म्हणून विचारशील तर… बघ तुला जमतंय का मनातलं ओळखायला?’ असं म्हणून कुमुद हसू लागली. “ठीक आहे. तू थांब इथे. मी आलोच.’ असं म्हणून मंदार निघून गेला आणि थोड्यावेळाने परत आला. त्याच्या हातातली रानचाफ्याची फुलं त्याने कुमुदच्या ओंजळीत टाकली.

कुमुदने डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्‍वास आत घेत त्या चाफ्याचा सुगंध घेतला. “मंदार तुला सांगू; खोलीमध्ये ही फुलं ठेवली ना की त्याचा दरवळणारा सुगंध मला माझ्या रियाजात आणखीनच तल्लीन करत जातो. मी स्वरांशी आणि हा दरवळ माझ्याशी असा काही एकरूप होऊन जातो की; भान विसरून गातच बसावसं वाटतं. आणि वाटतं…’ मंदारने कुमुदच्या नजरेस नजर देत विचारलं, “…आणि काय वाटतं?’ कुमुद भावनेच्या आवेशात बोलतच गेली.

“आणि वाटतं; हा चाफा माझ्या ओंजळीत टाकणाऱ्या या हातांना स्पर्श करण्याची ओढ आयुष्यभर लागून राहावी!’ मंदार कुमुदकडे पाहून हसू लागला. त्याला त्याच्या प्रश्‍नाचं उत्तर मिळालं होतं. कुमुद देखील तिच्या त्या सात सुरांएवढीच खरी आणि शुद्ध होती!
भिंतीवरच्या कॅलेंडरची पानं झरझर पालटत गेली. गेल्या काही वर्षांत कित्येकदा घड्याळातल्या काट्यांना मागे फिरवत; भूतकाळातल्या त्या गोड क्षणांना या दोघांनी पुन्हा जगून घेतलं होतं!

आजही मंदारची आई, “माझं सोनुलं गं बाळ ते!’ म्हणताना गालावरून हात फिरवते; पण तिच्या नातीच्या! तिचं नाव कुंदा. “लोणचं छान मुरलंय गं उमा.’ असं सांगताना दोन्ही कुटुंबातले नाते देखील तेवढेच मुरलेले दिसून येते! आणि आजही कुमुद गाण्याच्या रियाजाला बसली; की तिच्या ओंजळीत न चुकता “रानचाफा’ पडतोच…!

अमोल भालेराव

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.