शाळकरी मुली बनल्या रणरागिणी

अकोले – शाळा सुटल्यावर घरी निघालेल्या सहा मुलींची रोडरोओंनी छेडछाड केली. या मुलींनी रणरागिनीचा अवतारधारण करून या चौघांची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे तालुक्‍यात हा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे. तालुक्‍यातील पिंपळगाव नाकविंदा येथील विद्यार्थ्यांची वनभोजन सहल प्राचार्य सुनील धुमाळ यांनी आयोजित केली होती.

दिवसभर वनभोजनाची सफर केलेल्या मुलांनी शेवटी शालेय कामकाज संपल्यानंतर शाळेत हजेरी लावली. त्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या गावाकडे व वाड्या-वस्त्यांकडे निघून गेले. अशाच सहा मुली रस्त्याने आपल्या गावी चालल्या होत्या. त्याच रस्त्याने कोंभाळणे येथील रोडरोमिओ चाललेले होते. त्यांनी या मुलींवर टॉंटिंग सुरू केली. तसेच मुलींचा राग अनावर होईल, अशा प्रकारची कृती केली.

दरम्यान मुलींना रस्त्याच्या कडेला असणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती काळे यांचे घर दिसले. त्यांनी मारुती काळे यांना घराबाहेर बोलावून या सडकसख्याहरींचा प्रताप सांगितला. काळे यांनी या मुलांना दटावले. परंतु ती उद्धटपणाने उत्तर देऊ लागली. या प्रकाराने चिडलेल्या मुलींनी मग आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यांनी हातातील दप्तर बाजूला ठेवले. पायातील चप्पल काढून जमा झालेल्या गर्दीपुढे या चौघांना यथेच्छ झोडपून काढले आणि आया-बहिणी घरी असताना असा प्रताप परत जर दाखवला तर तुमची गय केली जाणार नाही, अशा प्रकारची तंबी त्यांना दिली. काळे यांनी चौघांना या मुलींच्या पाया पडण्यास भाग पाडले. तसे जर असे कृत्य पुन्हा केले, तर पोलिसांच्या ताब्यात देईल, अशी तंबी दिली. त्यानंतर माफीनामा झाला आणि मुले आणि मुली आपापल्या मार्गाकडे मार्गक्रमण करते झाले. परंतु हा विषय मात्र तालुक्‍याच्या सर्वच राजकीय व सामाजिक वर्तुळात खमंग चवीने चर्चिला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.