सातारा,(प्रतिनिधी)- माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. रामराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या समर्थकांनी विरोध केल्यानंतर महायुतीत चांगलीच गरमागरमी सुरु आहे. रणजितसिंहांची उमेदवारी मान्य नसून आम्ही त्यांचे काम करणार नाही अशी भूमिका आ. रामराजे व समर्थकांनी शुक्रवारी मुंबईत देवगिरीवर पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत घेतली. माढ्यातील तिढा सोडवण्यासाठी अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
फलटण तालुक्यात आ. रामराजे व खा. रणजितसिंह यांच्यात राजकीय वैर आहे. दोघांमध्ये नेहमीच टोकाची टीका होत असते. त्यातच रणजितसिंहांचे मित्र आ. जयकुमार गोरेही आ. रामराजे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे रामराजेंनी रणजितसिंहांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फलटण येथे शक्तीप्रदर्शन करत रणजितसिंहांचे काम करणार नसल्याची रोखठोक भूमिका रामराजेंनी घेतली होती.
हा संघर्ष मिटवण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांच्यासमवेत आ. रामराजे, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी महायुतीच्या उमेदवाराचे काम करा अशी सूचना अजित पवार यांनी केली. मात्र, या बैठकीत रामराजे यांनी रणजितसिंहांचे काम करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. रणजितसिंह सोडून कोणीही उमेदवार असता तर आम्ही मोठ्या ताकदीने काम केले असते.
मात्र, या उमेदवारासाठी आम्ही मते मागणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही. मतदारसंघात रणजितसिंहांबद्दल भावना तीव्र असून कार्यकर्ते त्यांचे काम करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे आ. रामराजे यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
आ. दीपक चव्हाण, संजीवराजे ना. निंबाळकर, प्रभाकर घार्गे यांनीही रणजितसिंहांच्या तक्रारीचा पाढाच वाचला. महायुतीला मागे खेचण्याची आमची भूमिका नाही. मात्र, रणजितसिंह सोडून आम्ही अन्य कोणाचेही काम करायला तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. हा प्रश्न सामोपचाराने मिटवावा, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली. मात्र, या बैठकीत रणजितसिंह निंबाळकर यांना सहकार्य करण्याबाबतचा निर्णय झाला नाही.
रणजितसिंहांकडून रामराजेंच्या तक्रारी
खा. रणजितसिंह नाक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल यांनी शुक्रवारी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माढा मतदारसंघातील घडामोडींबाबत चर्चा केली.
मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष विरोधी गटाला सहकार्य करत असून विरोधी उमेदवारांना मदत करत असल्याची तक्रार रणजितसिंह यांनी फडणवीस यांच्याकडे केली. आ. रामराजे ना. निंबाळकर व त्यांचे समर्थक फलटण मतदारसंघात महायुतीचे काम करत नसल्याबाबत रणजितसिंहांनी फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. याबाबत चर्चेतून प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही फडवणीस यांनी यावेळी दिली.