मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित १८ व्या रमेश देसाई मेमोरियल १२ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कर्नाटकाच्या पुनीत एम याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलींच्या गटात हरियाणाच्या सरेना गहलोट हीने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत कर्नाटकच्या पुनीत एम याने महाराष्ट्राच्या आरव छल्लानीचा ६-३, ५-७, ७-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधी काल दुहेरीत पुनीत एम याने उत्तर प्रदेशच्या युवान गर्गच्या साथीत विजेतेपद पटकावले होते.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत हरियाणाच्या सरेना गहलोटने खुशी कादियनचा ७-६, ६-१ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा आणि एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, एआयटीए सुपरवायझर हिमांशु मलिक यांच्या हस्ते करण्यात आले.