आज दीक्षा महोत्सव : जैन भाविकांची लक्षणीय उपस्थिती
पिंपरी (प्रतिनिधी) – सांसारिक मोह-मायेचा त्याग करुन संन्यासी जीवनाच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या दीक्षार्थी प्रिती आणि सिमरन जैन (शर्मा) यांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये पार पडला. दीक्षार्थींनी कुटुंबीय आणि समाजातील बांधवांना रक्षा धागा बांधला. भक्तीगीत, धार्मिक नाटिका आदी कार्यक्रम त्यानिमित्त घेण्यात आले. सांसरिक आयुष्य सोडून संन्यास धर्माचा अवलंब करण्यापूर्वी हा कार्यक्रम घेण्याची पद्धत आहे. कार्यक्रमाला जैन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचवडगाव जैन श्रावक संघ आणि कल्याण प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दीक्षार्थी बहिणींच्या आज झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाला श्रमणसंघीय युवाचार्य महेंद्रऋषीजी, उपाध्याय प्रवर रवींद्रमुनीजी, उपप्रवर्तक पारसमुनीजी, साध्वी अर्चनाश्रीजी, डॉ. स्नेहप्रभाजी, रिद्धीमाजी आदी साधू-साध्वी उपस्थित होते. धर्म दीक्षा प्रदाता आनंदकुमारजी फुलफगर आणि रवींद्रजी दुगड कुटूंबियांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानिमित्त तरुण मोदी यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला.
चिंचवड बहुमंडळाच्या वतीने “सोलह सतिया’ ही विशेष नाटिका सादर करण्यात आली. चिंचवडगाव जैन श्रावक संघाच्या वतीने दीक्षार्थींच्या धर्म दीक्षा प्रदाता आई-वडीलांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, रविवारी (दि. 8) दीक्षा झाल्यानंतर दीक्षार्थी सांसारिक आयुष्य सोडून संन्यास धर्माचा अवलंब करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सांसारिक आयुष्यातून त्यांना बिदाई देण्याचा कार्यक्रम शनिवारी (दि. 7) रात्री पार पडला.
शुक्रवारी दीक्षार्थींची मिरवणूक काढण्यात आली. तसेच, सायंकाळी “नवकार मेलडी’ ही धार्मिक गीतांची संगीत संध्या रंगली. कल्याण प्रतिष्ठान येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
आज दीक्षा महोत्सव
दीक्षार्थी प्रिती आणि सिमरन जैन (शर्मा) या दोन्ही बहिणी आहेत. त्या मूळ नवांशहर (पंजाब) येथील आहेत. सुनिता व मंजित शर्मा हे त्यांचे आई-वडील आहेत. दीक्षार्थींचा जैन भागवती दीक्षा महोत्सवाचा कार्यक्रम चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये सकाळी आठपासून सुरू होणार आहे. युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. त्यांना दीक्षामंत्र देतील. या प्रसंगी साधु-साध्वी आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.