जुनी भिंत कोसळून तीन शेळ्यांचा मृत्यू

एक गंभीर जखमी, शेतकरी बचावले

सविंदणे – येथील सविंदणे-लोणी रस्त्यावरील लंघेमळा येथील ज्ञानेश्‍वर भिकाजी लंघे यांच्या घराची व गोठ्याची एकत्रित असणारी भिंत कोसळून 3 शेळ्यांचा मृत्यू झाला. यात 1 शेळी गंभीर जखमी झाली आहे. भिंत कोसळ्यानंतर इतर शेळया बाहेर पळाल्यामुळे वाचल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान टळले आहे. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

ही घटना शनिवारी (दि.7) सकाळी आठ वाजता घटना घडली. लंघेमळा येथील लंघे यांचे घर आहे. त्यांच्या राहत्या घराची भिंत आणि गोठ्याची भिंत एकत्रित आहे. ही भिंत मातीची होती. त्यामुळे भिंत जीर्ण झाली होती. सकाळी आठ वाजता ही सामाईक असलेली भिंत अचानक कोसळली. यात तीन शेळ्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. तर एक शेळी जखमी झाली. भिंत पडल्यानंतर इतर शेळ्या गोठ्यातून बाहेर पळाल्यामुळे वाचल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी यु. एन. फुंदे, तलाठी एस. आर. सातपुते, कोतवाल शंकर पंचरास यांनी
घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. योग्य त्या कार्यवाहीसाठी शिरूर तहसीलदार यांच्याकडे सादर केला आहे.

भिंत कोसळताना तिघेही बाहेर
शेतकरी गावात दूध घालण्यासाठी गावात गेले होते. पत्नी घराबाहेर काम करीत होत्या. मुलगा सोमनाथ हा शेळ्या सोडण्यासाठी गोठ्यात चालला होता. त्याचवेळी अचानक भिंत कोसळली. तो थोडा बाजूला असल्याने व घरातील इतर व्यक्‍ती बाहेर असल्यामुळे थोडक्‍यात तीनजण वाचले आहेत. त्यामुळे जीवितहानी टळली. घराची भिंत कोसळल्याने राहायला घर राहिले नाही. राज्य शासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्याला मदत मिळवून द्यावी, अशी मागणी तंटामुक्‍तीचे अध्यक्ष फुला लंघे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.