मुंबई – भारतीय शेअर मार्केट मधील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांचे आज हदयविकाराने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु काही काळासाठी त्यांना घरी सोडण्यात आले होते. आज पहाटे त्यांना हदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे त्यांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आले; पण त्यांचे तेथेच प्राणोत्क्रमण झाले.
झुनझुनवाला यांनी अलीकडेच अकसा एअरलाईन्स ही विमान कंपनी सुरू केली होती. व नुकतेच या कंपनीने प्रत्यक्ष हवाई प्रवासालाही सुरुवात केली होती.त्यांच्या विमान कंपनीच्या मुंबई-अहमदाबाद विमान सेवेला नुकताच प्रारंभ झाला होता. व त्यावेळी ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. हाच त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. शेअर बाजारातील व्यवहारात त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली होती. त्यांची एकूण संपत्ती ही 5.5 अब्ज डॉलर्स इतकी होती व जगप्रसिद्ध फोर्ब मासिकानेही त्यांची दखल घेतली होती. दलाल स्ट्रीटवर त्यांची ओळख बिग बुल अशी होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, त्यांनी आर्थिक क्षेत्रात आपल्या वेगळ्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. देशाच्या विकासात त्यांना मोठी आस्था होती. त्यांचे असे अचानक आपल्यातून जाणे वेदनादायी आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्याबाबत थोडक्यात माहिती
– राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज.
– भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 32 व्या स्थानी.
– सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक.
– ऍपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष.
– कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड, प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड यांसारख्या कंपन्याच्या संचालक मंडळावर होते.
– राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के भागीदारी.
– पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या आसपास होते.
– “स्टार हेल्थ’मध्ये त्यांची 14.39 टक्के भागिदारी होती.