शहरात 250 पथदिवे, सहा हायमास्ट दिवे बसवणार
राजगुरूनगर- राजगुरूनगर शहरात विविध ठिकाणी 250 नवीन पथदिवे (स्ट्रीट लाईट) खांब (पोल) आणि 6 नवीन हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत यासाठी 78 लाख 57 हजार 314 रुपये मंजूर झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजगुरूनगर शहरातील विकास कामे सुरु असल्याने त्यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय व नव्याने मंजूर झालेल्या शहरातील लाईट पोल याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक मनोहर सांडभोर, संपदा सांडभोर, रेखा श्रोत्रिय, सारिका घुमटकर, अर्चना घुमटकर, किशोर ओसवाल, ऍड. सुरेश कौदरे, राजू जाधव, रफिक मोमीन, शंकर राक्षे, नीलेश घुमटकर आदी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे एक वर्षापूर्वी नगरपरिषदेने मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यलयाकडून नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदेच्या मूलभूत विकासासाठी प्राप्त झालेल्या सहाय्य योजने अंतर्गत हा निधी उपलब्ध झाला आहे. याकामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. अनेक ठिकाणी कामास सुरुवात झाली आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरासाठी पाणी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चासकमान धरणाचा स्रोत असलेल्या या योजनेमुळे शहरात मुबलक प्रमाणात व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे .शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना पुढील काळात हा प्रश्न कधीच भेडसावणार नाही. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या योजनेचे पाणी नागरिकांना मिळणार आहे.
- नागरिकांनी सहकार्य कारवे
मुख्य जलवाहिनी तसेच वितरिका टाकण्याचे काम रस्त्यांच्या लगत सुरू आहे. हे काम होताना नागरिकांची अनेक प्रकारची अडचण होत आहे. तसेच वाहनांची गर्दी होऊन वारंवार वाहतूककोंडी होत आहे. मात्र, काहीकाळ त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले.