मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जातीवादी राजकारण करतात अशी टीका राज ठाकरे यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंची तुलना ओवेसी यांच्याशी करण्यात आली आहे.राज ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे ओवेसी आहेत. ते ओवेसी मुस्लीम समाजाला भडकवण्याचे काम करतात. तर हे हिंदू समाजाला भडकवण्याचे काम करतात. दोघांचीही मातृसंस्था एकच आहे, अशी जहरी टीका राष्ट्रवादी प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केली आहे.
महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा मुळ मुद्द्यांना बगल देऊन राज ठाकरेंनी आता हिंदूंची माथी भडकवण्याचे काम केले आहे, असे चव्हाण म्हणाले. राज ठाकरे हे हिंदू असतील तर हनुमान चालीसा न बघता म्हणून दाखवावी, असे आव्हान देखील चव्हाण यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
दरम्यान, सुरज चव्हाण यांनी राज ठाकरे भाजपच्या आदेशावर बोलत असल्याची अप्रत्यक्ष टीका केल्यानंतर राज्यात नवा वाद उद्भवला आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांना राज्यात जातीवाद वाढवण्यास जबाबदार धरल्यानं राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे.