Beed Lok Sabha Election| लोकसभा निववडुकीतील महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली आहे. यातच आता महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी नोटीस बजावली आहे.
त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावीत व खर्चात तफावत राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीदरम्यान बजरंग सोनवणे यांनी 7 ते 10 मे या कालावधीतील खर्च सादर केला. यात एकुण 9 लाख 59 हजार 231 ऐवढी तफावत मान्य करण्यात आली आहे.
याप्रकरणी खर्च मान्य करूनही तशी नोंद आपल्या निवडणूक खर्च नोंदवहीमध्ये केली नसल्याने त्याबाबत लेखी खुलासा तात्काळ सादर करण्याचा आदेश दिला होता. तसेच तफावत रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट करून तपासणीकरिता सादर करण्याची सूचना सोनवणे यांना दिली होती.
दुसरीकडे, पंकजा मुंडे यांच्याही खर्चाची तपासणी करण्यात आली. या कालावधीत 16 लाख 66 हजार 431 एवढ्या रकमेची तफावत दिसून आली. तर 3 मे 10 मे या कालावधीत एकूण 20 लाख 94 हजार 40 एवढ्या रकमेची तफावत आढळून आल्याने मुंडे यांना नोटीस बजावली होती. तसेच ही रक्कम खर्चात समाविष्ट करुन निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करावी, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.
बीड लोकसभा मतदार संघातील लढत
बीड लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या दोघांमधील प्रचाराला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ओबीसी विरुद्ध मराठा, असा जातीय रंग देण्यास सुरुवात झाली.
मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि त्याचे हिंसक पडसाद बीड जिल्ह्यात उमटले होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांवरील गुन्हे, मराठा विरुद्ध ओबीसी नेत्यांमधील वाद हे या निवडणुकीत निर्णायक ठरु शकतात. बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान झाले आहे. तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.