आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
वेल्हे (प्रतिनिधी): कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांसाठी पर्वणी असलेल्या वेल्हे तालुक्यातील तोरणागड, राजगड, पानशेत धरण, वरसगाव धरण, गुंजवणी धरण, मढेघाट,कुंबघाट येथील वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश भोरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी काढले आहेत.
वेल्हे व भोर तालुक्यात सर्वाधिक पाऊस होत असतो. त्यामुळे गुंजवणी, पानशेत, वरसगाव, भाटघर, निरा देवधर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वर्षा पर्यटनासाठी येत असतात. तसेच दोन्ही तालुके हे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून दरवर्षी वेल्हे तालुक्यातील तोरणा, राजगड व भोर तालुक्यातील रायरी व रोहिडेश्वर येथील गडकिल्ल्यांवर हजारो पर्यटकांची रीघ लागलेली असते.
तसेच वेल्हे तालुक्यातील सुप्रसिद्ध मढेघाट धबधबा, धानेपचा सोफासेट धबधबा, धान्येश्वर देवस्थान, पाबे येथील तामजाईचा सुप्रसिद्ध कडा, भट्टीचा धबधबा व भोर तालुक्यातील वरंधा घाट परिसर, बनेश्वर देवस्थान हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून येथे शनिवार, रविवार व स्थानिक सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटकांची रेलचेल सुरू असते.
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे येथील परिसरात अनेकजण पाण्यात बुडून, पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत.
कोरोना संक्रमणाचा वाढता आलेख पाहता नागरिकांनी यंदा कोठेही न जाता सुरक्षितपणे घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा ज्या पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून त्यांच्याकडे असलेले वाहन देखील जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी घराबाहेर न पडता घरीच राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
– विनायक देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वेल्हे पोलीस ठाणे.