नवी दिल्ली – आम्ही लोकसभाध्यक्षांकडे 19 जुलैला मागणी केली असली तरी त्याबाबतची कायदेशीर पुर्तता 18 जुलैलाच केली होती. त्याबाबतचे पत्र लोकसभा सचिवालयाने 19 जुलैला जारी केले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर माझी गटनेतेपदी नियुक्ती झाली. विनायक राऊत यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी राहुल शेवाळेंच्या नियुक्तीवर खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप नोंदवला होता. यावर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल शेवाळे म्हणाले, यासंदर्भात चिराग पासवान यांच्या हायकोर्टातील केसचा दाखला देता येईल. ज्या दिवशी त्यांनी गटनेतेपदाची मागणी केली, त्याच दिवशी त्यांची नियुक्ती झाली होती. हायकोर्टानेही याला मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे माझीही गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे विनायक राऊत यांनी कोर्टात धाव घेतली, तरी त्यांचा निभाव लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पुढील निवडणूक युतीच्या माध्यमातूनच
2014ची विधानसभेची निवडणूक आणि 2019ची लोकसभेची निवडणूक आम्ही युतीच्या माध्यमातूनच लढवली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोकांनी आम्हाला निवडून दिले होते. आतादेखील आम्ही काही वेगळे केलेले नाही. 2024ची निवडणूकही आम्ही याच युतीच्या माध्यमातून लढवणार आहोत. त्यामुळे लोकांचा आमच्यावर व शिवसेना-भाजप युतीवर पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससोबत जाणे ही खरे तर लोकांची फसवणूक होती, असा हल्लाबोल राहुल शेवाळे यांनी केला.