मुंबई : आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय युवासेना नेते राहुल कनाल शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला. राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. आता राहुल कनाल यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे राजकीय चर्चां रंगत आहेत.
‘बात घमंड की नहीं, बात इज्जत की है, लोगो ने अपने लहेजे बदल दिए, तो हमने रास्ते बदल दिए’ असा शेर मारत ठाकरे गटावर निशाणा साधत आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल कनाल यांना शाल आणि पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले.
तत्पूर्वी, वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. यावरून राहुल कनाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. ट्वीट करत राहुल कनाल म्हणाले होते, “दु:ख होतंय..! हे कोणी केलंय, सर्वांना चांगलं माहिती आहे. पण, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं, त्यांचं न ऐकता काढून टाकणं, हा अहंकार आहे.” असे म्हटले होते.