मंचर – पुण्याची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका राजेश महाजन हिने हरियाणा, गुरगाव येथे झालेल्या 18 वर्षांखालील गटाच्या सुपर सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत एकेरीत विजेतेपद पटकावले. पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांनी राधिका हिचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत दुसरे मानांकन असलेल्या राधिकाने अंतिम लढतीत हरियाणाच्या तरण्णा टाकरियाचा 6-3, 6-3 असा सरळ पराभव केला.
उपांत्य फेरीत राधिकाने दिल्लीच्या राधिका तलवारचा 7-5, 6-2 असा पराभव केला होता. यंदाच्या मोसमात राधिकाने अहमदाबाद व सोनीपत पाठोपठ तिसरे विजेतेपद पटकावीत हॅट्ट्रिक साधली आहे.
एप्रिलमध्ये हरियाणात झालेल्या दोन्ही स्पर्धेत दुहेरीत उपविजेतेपद पटकाविले होते. 17 वर्षीय राधिका इंदिरानगर बिबवेवाडी येथील विश्वकर्मा कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागात बारावीत शिकत असून ती नंदन बाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या टेनिस कोर्टवर सराव करत आहे.