R. Madhavan : अभिनेता आर. माधवन त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या ‘रॉकेट्री’ या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील देण्यात आले होते. सध्या ‘द रेल्वे मॅन’ या वेबसीरीजमुळे तो चर्चेत आला आहे. यातच त्याने एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेता आर. माधवनला चक्क अभिनेत्री जुही चावलासोबत लग्न करायचे होते. याबद्दल त्याने त्याच्या आईला देखील सांगितल्याचे त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
आर माधवनसोबत जुही चावला नेटफ्लिक्सच्या ‘द रेल्वे मॅन’ या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आर माधवनने सांगितले, ‘मला जुहीजी आणि सर्वांसमोर कबूल करायचे आहे की, मी जुहीचा ‘कयामत से कयामत तक’ पाहिल्यानंतर माझ्या आईला मला जुही चावलासोबत लग्न करायचे आहे, असे सांगितले. तिच्या सोबत लग्न करणे हे माझे ध्येय होते, हे सुद्धा मी माझ्या आईला सांगितले. त्यावेळी आई जोरजोरात हसू लागली होती.'” सध्या आर. माधवनचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
‘कयामत से कयामत तक’ मध्ये जुही चावलासोबत अमिर खानही प्रमुख भूमिकेत होता. चित्रपटाचे दिग्दर्शन मंसूर खानने केले होते. त्यावेळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटातून जुही चावलाला ‘सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार’ मिळाला होता.
दरम्यान, ‘द रेल्वे मॅन’ या सीरीजच्या माध्यमातून प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचा मुलगा शिव रवैलने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. यात के मेनन, आर माधवन, बाबिल खान आणि दिव्येंदु मुख्य भूमिकेत आहेत. ही वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.