चिखली, दि. 6 – महापालिकेच्या वतीने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येत आहे. परंतु पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे परंतु महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे चांगलेच फावत आहे. अशा अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
थरमॅक्स चौक ते चिखलीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक खासगी संस्था, इन्स्टिट्यूट, राजकीय कार्यकर्ते यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. परंतु महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग लावणारे जोमात आहेत. कस्तुरी मार्केट चौक, साने चौक, म्हेत्रे गार्डन, टॉवरलाइन, अष्टविनायक चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. परंतु महापालिकेचा फ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण विरोधी पथक केवळ बघून थंड बसत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करण्यात येत आहे. हे फ्लेक्स धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांनी आपल्या परिसरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करून ज्यांचा फ्लेक्स असेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.
टॉवरलाइन की फ्लेक्स लाइन?
चिखली येथील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणे वस्ती परिसरातून टॉवर लाइन गेली आहे. या टॉवरवर धोकादायक पद्धतीने आणि अनधिकृतपणे अनेक राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच व्यावसायिकांनी बेकायदा फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे या परिसरातून येजा करताना नेमके टॉवर लाइन जातो आहे की फ्लेक्सलाइन असा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.