फसवणूक करणाऱ्यांना घरी बसवा

डॉ. कोल्हेंच्या प्रचारार्थ आळंदी येथील सभेत दिलीप वळसेपाटील यांचे आवाहन

आळंदी – ज्यांनी पंधरा वर्षे घोर फसवणूक केली, मतदारांची दिशाभूल केली. त्यांना आता घरी बसवा, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी येथे केले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आळंदी येथील सभेत वळसेपाटील बोलत होते.

यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, दिलीप मोहिते, रामभाऊ कांडगे, बाबासाहेब राक्षे, बाळासाहेब ठाकूर, मंगलदास बांदल, डी. डी. भोसले, रमेश पवार, रवींद्र बुट्‌टे पाटील, शांताराम भोसले, विलास कातोरे, पोपटराव तांदळे, आप्पासाहेब देशमुख, सुरेश चौधरी, बाळासाहेब चौधरी, संध्या जाधव, दिपाली काळे, कैलास सांडभोर, नंदूकाका वडगावकर, मनसेचे बाळूजी नेटके, भगवान लोखंडे, कॉंग्रेसचे नेते विजय डोळस, हिराअण्णा सातकर, पंडीतराव तळेकर, दिगंबर तळेकर, प्रदीप राक्षे, सतीश राक्षे, निलेश घुंडरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

…मग त्यांचे काय?

मुख्यमंत्री म्हणतात डॉ. अमोल कोल्हे अभिनय चांगले करतात. त्यांनी अभिनयच करावा. मग स्मृती इराणी, हेमामालिनी, सनी देओल यांनीही अभिनय करावा. त्यांचे राजकारणात काय काम? असा सवाल डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला.

वळसेपाटील म्हणाले देहू-आळंदी-पंढरपूर विकास आराखडा मी व सुनील तटकरे यांनी केला, त्याची व्याप्ती वाढवली. आता देहू, आळंदी, चाकण, राजगुरुनगर यांचा विकास आराखडा करायचा आहे. विलास लांडे म्हणाले, पंधरा वर्षे या खासदाराने पैसा टाकला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी आळंदीसाठी पाइपलाइन केली; परंतु ती रखडली. आता भूलथापा मारणाऱ्या खासदाराला थारा देऊ नका. दिलीप मोहिते म्हणाले आळंदी परिसरातील विकासकामे आम्ही आणली आणि उद्‌घाटन मात्र यांच्या काळात होत आहेत. डी. डी. भोसले म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे.

मुख्यमंत्री केवळ आश्‍वासन देतात. उमेदवार डॉ. कोल्हे म्हणाले विमानतळाचा चुकीचा निर्णय घेऊन खासदार खेड तालुक्‍याला 25वर्षे मागे घेऊन गेलेत. सुबत्ता घालवली, सव्वालाख रोजगार घालवला. उद्धव ठाकरे तुम्ही शिवनेरीवरून गंगा आरतीसाठी माती घेऊन गेला, तुम्हाला इंद्रायणी का आठवली नाही? इंद्रायणी सुधार प्रकल्पाचे, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, आळंदी-तुळापूर एसटीपी प्रकल्प झाला पाहिजे. संत विद्यापीठाला चालना, संतसृष्टी निर्माण करायची आहे. यावेळी शशिकांत घुमरे यांनी 11हजारांचा निधी सुपूर्द केला. भारतीय बहुजन सेनेचे संजय बनसोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.