मतदान यंत्रांच्या “स्ट्रॉंग रूम’मध्ये “जॅमर’ बसवा!

कॉंग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
मुंबई – लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी मोबाइल टॉवर्स किंवा वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती असून, सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्रे ठेवलेल्या “स्ट्रॉंग रूम’मध्ये “जॅमर’ बसविण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांची आज भेट घेतली. शिष्टमंडळात माजी मंत्री, आमदार नसीम खान, आमदार भाई जगताप, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, अभिजीत सपकाळ, डॉ. रामकिशन ओझा, डॉ. गजानन देसाई आदींचा समावेश होता.

अश्वनीकुमार यांना दिलेल्या निवेदनात अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांकडे कॉंग्रेसने आयोगाचे लक्ष वेधले आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण यांनी माहिती दिली. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर समाजातील अनेक घटकांनी प्रामुख्याने काही तज्ज्ञांनी वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूममधील मतदान यंत्रांशी छेडछाड होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. तसे घडले तर तो लोकशाहीसाठी एक गंभीर धोका असेल.

हा धोका टाळून निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता कायम रहावी, यादृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व स्ट्रॉंग रूममध्ये तातडीने जॅमर बसविण्याची मागणी त्यांनी केली. मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना देखील हे जॅमर कार्यान्वीत असले पाहिजे, अशीही अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.

प्रत्येक फेरीचा निकाल जाहिर करा!
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर केला जावा आणि त्यानंतरच पुढील फेरीची मतमोजणी सुरू केली जावी, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही मतदान यंत्रांच्या निकालाची व्हीव्हीपॅटशी पडताळणी केली जाणार आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करताना संबंधीत मतदान यंत्रे कोणत्या मतदान केंद्रावरील असावीत, हे निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना देण्यात यावे, अशी मागणी करतानाच एकूण मतदान यंत्रांपैकी 50 टक्के मतदान यंत्रांची व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी केली जावी. या आपल्या जुन्या मागणीचा कॉंग्रेस पक्षाने पूनरूच्चार केला. एखाद्या मतदान यंत्रावर संशय असल्यास संबंधित यंत्राची चार वेळा मतमोजणी करण्याची मुभा देण्यात यावी, अशीही मागणी कॉंग्रेसने केली आहे.

शेवटच्या उमेदवाराची प्रथम मोजणी करण्याची मागणी
मतदान यंत्रांमध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांची मोजणी करताना पहिला अनुक्रमांक असलेल्या उमेदवाराला मिळालेल्या मतांची पहिली नोंद घेतली जाते. त्यानंतर चढत्या क्रमाने पुढील उमेदवारांना मिळालेली मते नोंदवली जातात. ही पद्धत बदलून अगोदर मतदान यंत्रावर सर्वात शेवटी असलेल्या उमेदवाराला मिळालेल्या मताची प्रथम नोंद घेतली जावी आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने उमेदवारांची मते मोजली जावीत, असेही कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.