गंगोलीहाट- उत्तराखंडमधील गंगोलीहाट येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुष्पा चित्रपटाचे संवाद सीएम पुष्कर सिंह धामी यांच्याशी जोडून वेगळ्या पद्धतीने सादर केले. ते म्हणाले, आजकाल पुष्पा या चित्रपटाच्या नावाची खूप चर्चा आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचे नाव पुष्कर आहे, पण पुष्कर हे नाव ऐकून कॉंग्रेसच्या लोकांना हे पुष्कर फूल आहे, असे वाटते पण मला त्यांना सांगायचे आहे की, आमचा पुष्कर. एक फूल सुद्धा आहे. आणि फायर देखील आहे. आमचा पुष्कर कधीही नतमस्तक होणार नाही आणि थांबणार नाही.
तत्पूर्वी संरक्षणमंत्र्यांनी कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “कॉंग्रेसबद्दल मी आदराने सांगू इच्छितो की, त्यांच्याकडे कोणतेही धोरण नाही, हेतू नाही आणि त्यांच्या विकासावर विश्वास नाही. कॉंग्रेसने नेहमीच देश आणि राज्याची लूट केली आहे. आम्ही उत्तराखंडला यापुढे झुकू देणार नाही.”उत्तराखंडच्या गंगोलीहाटमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसची अवस्था अशी आहे की ते मुख्यमंत्री घोषित करण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे त्यांनी कोणत्याही नेत्याची घोषणा केलेली नाही. त्यांच्या घराला आग लागली आहे.