चंदीगड – विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुका झालेल्या पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली आहे. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसला आम आदमी पक्षाने मोठा दणका दिला असून ११७ पैकी ९१ जागांवर आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये सत्तास्थापनासाठी बहुमताचा आकडा ५९ आहे. काँग्रेसला मागील पंचवार्षिक निवडणुकांमध्ये ७७ जागा मिळाल्या होत्या. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष मोठ्या बहुमताकडे आगेकुच करताना दिसतोय.
अशातच काँग्रेसला पंजाबमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला असून राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी हे पराभूत झाले आहेत. चन्नी यांनी पंजाबमध्ये चमकौर साहिब व भदौर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. प्राप्त वृत्तानुसार चन्नी हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भदौर हा चन्नी यांच्यासाठी नवा मतदारसंघ असला तरी चमकौर साहिब येथून ते २००७ पासून निवडून येत आहेत.
तत्पूर्वी, निवडणूक प्रचारसभांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चन्नी दोन्ही मतदारसंघातून पराभूत होणार असल्याचे भाकीत केले होते. आपने घेतलेल्या एका निवडणूकपूर्व सर्वेक्षणामध्ये चमकौर साहिब येथील ३५ टक्के नागरिकांनी चन्नी यांच्या समर्थनार्थ मत नोंदवले होते. आपच्या पारड्यात येथील ५२ टक्के नागरिकांनी कौल दिला होता. भदौर येथे चन्नी यांना ३० टक्के तर आप उमेदवाराला ४८ टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली होती.अशातच आता चन्नी यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने केजरीवाल यांचे भाकीत खरे ठरले आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये मिळालेल्या यशानंतर दिल्ली येथील कार्यालयातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबोधित केले. केजरीवाल बोलत असलेल्या स्टेजमागे बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंह यांचे पोस्टर लावण्यात आले होते. या विजयानंतर हुरळून न जाण्याचा सल्ला केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना देखील पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. सिद्धू यांचा पश्चिम अमृतसर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. विशेष म्हणजे हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ मनाला जातो.