पुणे – ड्रग्ज तस्कर ललित पाटील येरवडा कारागृहातुन ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या येरवडा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोमवारी अटक केली. डॉ. मरमाळे यांनी ललित पाटीलला ससून रुग्णालयात रेफर करण्यापूर्वी त्याचा भाऊ भूषण पाटील आणि मुख्य सुत्रधार अभिषेक बलकवडे यांच्याशी तब्बल १९ वेळा फोनवरुन संवाद साधला होता. यामुळे पळून जाण्याच्या कटात सहभागी म्हणून त्यांना अटक करण्यात आली आले.
दरम्यान डॉ. मुसळे यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ललित पाटील हा चाकण येथील ड्रग्ज प्रकरणात २०२० पासून कारागृहात होता. ललित पाटील आजारी असल्याचे कारण देऊन त्याची रवानगी येरवडा कारागृहातून ३ जून रोजी ससून रुग्णलयातील वार्ड क्र. १६ मध्ये करण्यात आली होती. दरम्यान १ ऑक्टोबर रोजी ससून ससून रुग्णालयाच्या गेटवरच दोन कोटींचे मॅफेड्रॉन विकत असतांना ललित पाटीलच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
यानंतर २ ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या भूषण पाटीलसह पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तसेच २८ नोव्हेंबर रोजी कारागृहातील समुपदेशक सुधारकर इंगळे याला अटक करण्यात आली. सुधाकर इंगळे याच्याकडे करण्यात आलेल्या तपास डॉ. मरसाळे यांचे नाव समोर आले. यानंतर अधिक तपास केला असता डॉ. संजय मरसाळे हे ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले.
ललित पाटील याला ३ जून रोजी येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. दि. १ ते ३ जून दरम्यान भूषण पाटील, अभिषेकी बलकवडे आणि डॉ. संजय मरसाळे यांच्यात १९ वेळा फोनवरून संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांनी अभिषेक बलकवडे याच्याकडून पैसे घेतले होते. यातील २० हजार डॉ. संजय मरसाळे यांना देण्यात आले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
“डॉ. संजय मरसाळे हा येरवडा कारागृहात रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. कैदी आजारी पडल्यानंतर ससून रुग्णालयात पाठविण्यासाठी डॉ. संजय मरसाळे यांची शिफारस गरजेची असते. त्यांनी ललितला ससूनला पाठवण्या अगोदर इतर आरोपींशी सलग दोन दिवस संपर्क साधला होता.” – रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे
– ललित पाटीलप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
– भूषण पाटील, अभिषेकी बलकवडे यांच्याशी १९ फोन काॅल
आमदार धंगेकर मागणीवर ठाम
ललित पाटील प्रकरणी कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलनही केले आहे. दरम्यान डीन डॉ.संजीव ठाकूर यांना अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. दरम्यान हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.
आणखी एक शिपाई निलंबित
ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाचा शिपाई मोईस अहमद शेख (३०) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत शेख याला सेवेतून निलंबीत केले. याप्रकरणाचा आदेश सोमवारी काढण्यात आला.