पुणे : पाणी टाकीचे काम दोन वर्षांपासून अर्धवट

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; “भामा आसखेड’चे श्रेय घेण्यासाठी मात्र धडपड

– संदीप घोडके

येरवडा – भामा आसखेड प्रकल्प पूुर्णत्वास येत असल्याने त्याचे क्षेय घेण्याची चढाओढ लोकप्रतिनिधींमध्ये लागली असली तरी स्व. नानासाहेब परुळेकर शाळेच्या परीसरात बांधण्यात येत असलेल्या 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम मात्र दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. विशेष म्हणजे याच टाकीत हे पाणी येणार असून येथून पाणी पुरवठ्याचे नियोजन आहे.

पूर्व भागातील येरवडा, लोहगाव, टिंगरेनगर, वडगावशेरी, चंदननगर, खराडी या वडगावशेरी मतदार संघातील भागाला भामाआसखेडचे पाणी मिळणार आहे. हे काम जवळपास पूर्ण झाले असून त्याची चाचणी सुरु झाली आहे. परंतु, नानासाहेब परुळेकर शाळेतील टाकीचे काम मात्र अर्धवट अवस्थेत आहे. या टाकीचे खांब उभारणीनंतर हे काम बंद पडले आहे. येथील साहित्यही चोरीला गेल्याचे समजते.

शासकीय जागेवरील काम बंद का? हे काम सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी का पुढाकार घेतला नाही? असे प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होऊ लागले आहेत. भामा आसखेडचे निम्मे काम पोलीस बंदोबस्तात झाले आहे. मग, परुळेकर शाळेतील पाण्याच्या टाकीचे काम पोलीस बंदोबस्तात का करण्यात आले नाही, याचे कोडेही नागरिक उकलत नाही. पाण्याची टाकीच नसेल तर मतदारसंघातील या भागात पाणी पुरवठा करणे अशक्‍य होणार आहे. त्यामुळे तातडीने हे काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत नगरसेविका शीतल सावंत म्हणाल्या की, पाणी पुरवठा होण्यासाठी परुळेकर शाळेतील 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे काम रखडले आहे.

पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे म्हणाले की, परुळेकर शाळेतील पाण्याच्या टाकीचे काम स्थानिक नागरिकांनी अडवल्यामुळे रखडले आहे. मात्र, भामा आसखेड प्रकल्प पूर्ण होत असल्याने रखडलेल्या टाकीचे काम देखील पोलीस बंदोबस्तात मार्गी लावणार आहे.

काम नाही अन्‌ उद्‌घाटनाची घाई…
भाजप तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी आपल्याचमुळे भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगत आहेत. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनी आपआपल्या नेत्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. प्रत्यक्षात मतदारसंघात तीन टाक्‍यांचे काम अर्धवट आहे, त्यांचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत मात्र कोणताही प्रतिनिधी, नेता की शासकीय अधिकारी ठामपणे सांगू शकत नाही.

भामा आसखेड प्रकल्पातील पाणी आल्यास पाण्याची साठवणूक करण्यासाठी मतदार संघात सात टाक्‍या आहेत. ही टाकी तसेच आणखी दोन पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण असून जागेचा वाद आहे.पालिका अधिकाऱ्यांना याबाबत कळविले असून अधिकारी योग्य तो निर्णय घेतील
– सुनील टिंगरे, आमदार 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.