पुणे : क्रीडा संकुल खड्डयात; श्रेयवादाचीच रेस

भूमिपूजन होवून काम रखडलेलेच : खेळाडूंच्या भवितव्याशी खेळ

कोथरूड – मैदानी खेळांसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या किंवा खेळू इच्छिणाऱ्या मुलांच्या सरावासाठी बावधन येथे राजा शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे भूमीपूजन झाले. कामाला सुरवातही झाले. मात्र, महापालिकेतील सत्ता बदलली आणि काही महिन्यातच क्रीडा संकुलाचे काम बंद पडले. केवळ श्रेयवादावरून हे काम थांबले असून, किमान मुलांच्या भवितव्यासाठी तरी लवकर हे क्रीडा संकुल खुले व्हावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

बावधन येथील एल.एम.डी चौकात माजी नगरसेवक व सभागृहनेते शंकर केमसे यांनी महापालिका निधीतून राष्ट्रीय दर्जाचे स्केटींग ट्रॅकसह बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल, कबड्डी आदी खेळांचे मैदान करण्याचे नियोजन केले. 2016 मध्ये या कामाचे भूमीपूजन होवून कामाला सुरवात झाली. मात्र, 2017 मध्ये महापालिकेत सत्तातरण झाले आणि नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना या क्रीडा संकुलाच्या कामाचा विसर पडला. पहिल्या टप्यात मंजूर एक कोटीच्या निधीतून स्केटींग ट्रॅक तयार करण्यात आला, तर त्याचा बाजूलाच जॉगींग ट्रॅक केला; मात्र तोही अपूर्ण अवस्थेत आहे. निधी संपला आणि कामही बंद झाले.

त्यामुळे मागील तीन वर्षांत याठिकाणी स्केटींगचा सराव होत नसला तरी, क्रिकेटप्रेमी क्रिकेट खेळतात. मात्र, रात्रीच्यावेळी याठिकाणी मद्यपी दारू पीत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता, दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. संकुलाचा मुख्य दरवाजा गंजलेला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात खेळाचे मैदान तयार करण्याच्या कामाला अद्याप सुरवातही झाली नाही.

येत्या काही महिन्यांत कामाला सुरुवात
क्रीडा संकुलासाठी सुरवातीला एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. त्यामध्ये स्केटींग आणि जॉगींग ट्रॅक (अपूर्ण आहे) तयार केले. त्याच्या बाजूला बॅडमिंटन कोर्ट, कबड्डी ग्राऊंड, टेबल टेनिस तयार करण्यात येणार आहे. संकुलाच्या सुरवातीला कमान उभारण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी साठ लाख निधीची मागणी केली आहे. तो उपलब्ध झाल्यावर काम सुरू होईल, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

दूषित पाणी जॉगिंग ट्रॅकवर
राजा शिवछपत्री क्रीडा संकुलाच्या शेजारी असलेल्या सोसायटीतील दुषीत पाणी जॉगींग ट्रॅकवर येत आहे. हे पाणी सोडले आहे की, ड्रेनेजचे पाणी येते याबाबत अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनाही माहित नाही. तर क्षेत्रीय अधिकारी संदीप कदम यांनी त्याबाबत तत्काळ पाहणी करून कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

मुलांच्या आनंदापेक्षा श्रेयवादाचे राजकारण
भारतीय जनता पक्षाने आघाडीच्या काळातील अपूर्ण अवस्थेत असलेली विकासकामे पूर्ण करून जनतेसाठी खुली केली. मात्र, याठिकाणी हे संकुल पूर्ण केले तर श्रेय दुसऱ्याला जाईल. त्यामुळे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे. मागील तीन वर्षांत हे काम पूर्ण झाले असते तर मुले आनंदाने खेळली असती. मुलांच्या आनंदापेक्षा श्रेयवादाचे राजकराणामुळे हे काम अपूर्णावस्थेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.