पुणे – समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टाकीपासून मुख्य जलवाहिनी आणि त्याच्या इतर जोडवाहिन्यांना स्वयंचलित व्हॉल्वद्वारे पाणी दिले जाणार आहे. याबाबतचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर शहरातील पाच झोनमध्ये हे व्हॉल्व बसविण्यात येत आहेत. सध्या महापालिका चावीच्या व्हॉल्वद्वारे पाणी पुरवठा करते. त्यासाठी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी असते. मात्र, अनेकदा कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून राजकीय नेते तसेच नगरसेवक प्रभागाकडे पाणी पळवतात.
मात्र, या व्हॉल्वमुळे या प्रकारास आळा बसणार आहे. तसेच प्रत्येक घराला समान पाणी जाणार आहे. बाणेर येथील दोन टाक्या तसेच नगररस्ता परिसरातील तीन टाक्यांसाठी हे व्हॉल्व बसविण्यात येत असून, त्याद्वारे जवळपास तीन लाख नागरिकांना पाणी देण्यात येणार आहे. महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराचे 141 झोन करण्यात आले आहेत. यानुसार महापालिकेने पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे कोणत्या भागाला कोणत्या टाकीतून पाणी जाणार, हे निश्चित आहे.
तर आतापर्यंत 43 झोनचे काम पूर्ण झाले आहे. हे झोन टाक्यांना जोडण्यात येत असून त्याद्वारे पाणी दिले जात आहे. त्याच वेळी जुन्या यंत्रणेत मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व असून पुन्हा संबंधित भागासाठी स्वतंत्र व्हॉल्व आहेत. महापालिकेने निश्चित केलेल्या वेळेनुसार महापालिकेचे चावीवाले या व्हॉल्वमधून पाणी सोडतात. तसेच कोणत्या भागात किती पाणी द्यायचे यासाठी संबंधित ठिकाणच्या व्हॉल्वच्या किती आट्या फिरवायच्या, हे निश्चित केलेले आहे.
मात्र, समान पाणीपुरवठा योजनेत हे काम स्वयंचलित व्हॉल्व करणार असून, संबधित भागातील लोकसंख्येनुसार किती दाबाने तसेच किती वेळ पाणी सोडायचे याचा संगणक प्रोग्राम असेल. त्याद्वारे “स्काडा’ यंत्रणेनुसार एकाच ठिकाणी बसून हे व्हॉल्व नियंत्रित करून त्यानुसार पाणी दिले जाणार आहे.
पाळवापळवी थांबणार
शहरात विशेषत: निवडणुकांच्या काळात मतदारांसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात पळवापळवी केले जाते. अनेकदा चावीवाला पाणी सोडून गेल्यानंतर व्हॉल्वच्या चावीवर अवजड वाहने पार्क केली जातात. तर अनेकदा चावी राडारोडा टाकून काही वेळासाठी बुजवली जाते. त्यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडते. तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्वत: चाव्या तयार करून त्यासाठी कर्मचारी नेमले असून पालिकेने कर्मचारी पाणी बंद करून गेल्यानंतर हे परस्पर पुन्हा पाणी सुरू करत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.