हर्षद कटारिया
बिबवेवाडी – आकर्षक पारंपरिक वेशभूषा, वैशिष्ट्यपूर्ण देखावे, लेझीमसह विविध वाद्य पथके आणि “त्रिशलानंदन वीर की… जय बोले महावीर की…’ अशा जयघोषात भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिन रविवारी जैन बांधवांतर्फे उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला.
श्री जैन सामुदायिक उत्सव समितीतर्फे जैन समाजाचे चारही संप्रदाय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाजाच्या विद्यमाने श्री तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी श्री जैन सामुदायिक उत्सव समितीचे अचल जैन, भरत शहा, विजयकांत कोठारी, अनिल गेलडा, संपत जैन, समीर जैन, सतीश शहा, महावीर कटारिया, गणपत मेहता, बाळासाहेब धोका, नितीन जैन, राजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते. विविध सामाजिक संदेशाचे फलक हाती घेऊन या शोभायात्रेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सकाळी श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर, फुलवाला चौक येथून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. तेथून पुढे बोहरीआळी, लक्ष्मी रस्ता, सोन्या मारुती चौक येथे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, माधुरी मिसाळ, अभय छाजेड, प्रवीण चोरबोले, धीरज घाटे, मोहन जोशी, मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, अजय खेडेकर, हेमंत रासने, प्रशांत जगताप, श्रीनाथ भिमाले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचे स्वागत केले.
ही शोभायात्रा श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर, भांडी बाजार, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती चौक, गणेश पेठ, गोविंद हलवाई चौक, बुरडी पूल, पालखी विठोबा चौक, श्री शंस्वेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट, मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हन लव्हज् चौक, पुढे अप्सरा टॉकीज, कटारिया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर कार्यालय, सातारा रस्ता येथे येऊन आदिनाथ स्थानक येथे या शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रा व्यवस्था जय आनंद विहार ग्रुप यांनी केली होती. तसेच यानिमित्त शहर आणि उपनगरांत दिवसभर वैविध्यपूर्ण धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.