पुणे : शालेय शिक्षणमंत्री घेणार अधिकाऱ्यांची झाडाझडती

पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन आहे. याबरोबरच कामे जलदगतीने मार्गी लागण्याची आवश्‍यकता आहे. यादृष्टीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आढावा बैठकीद्वारे अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये काही कार्यालयांतील भ्रष्ट कारभारामुळे शिक्षण विभागाला कलंक लागला आहे. काही अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. शिक्षण विभागाचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. थेट शिक्षणमंत्र्याकडेही तक्रारी येत आहेत. विकासात्मक प्रकल्पाचे आराखडे तयार झाले आहेत. त्याबाबतची सद्य:स्थितीही जाणून घेण्यात येणार आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षणमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.29) सकाळी 11 वाजता मुंबई येथील बालभारतीच्या कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. याचा अजेंडाही निश्‍चित झाला असून त्यात 21 विषयांचा समावेश आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. बैठकीला अपर मुख्य सचिव, सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, शिक्षण आयुक्‍त, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, विद्या प्राधिकरण संचालक, बालभवन संचालक, बालभारती संचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक आदी प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.