पुणे – मनपा निवडणुका रखडल्याचा फटका उदयोन्मुख खेळाडूंना पुन्हा बसला आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा यंदाही घेण्यात येणार नाहीत. त्यामुळे सराव करणार्या खेळाडूंच्या पदरी यंदाही निराशा पडणार आहे. शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि खेळाडू घडविण्यासाठी महापालिकेने या स्पर्धा आणि खेळांचे कामकाज पाहण्यासाठी स्वतंत्र क्रीडा विभाग स्थापन केला आहे. अंदाजपत्रकात यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही आहे. मात्र, महापालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने, तसेच केवळ स्पर्धेचे नाव महापौर चषक असल्याने या स्पर्धांना खो बसला आहे.
राष्ट्रीय तसेच आंतराराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये शहरातील खेळाडूंचा सहभाग वाढावा, खेळाडूंना मदत व्हावी या उद्देशाने पालिकेकडून या स्पर्धा घेतल्या जातात. दरवर्षी जवळपास १८ ते २० खेळांच्या स्पर्धा भरतात. त्यामुळे शहरातील खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या स्पर्धेचा अनुभव उपयोगी पडतो. बक्षिसांमधून खेळाडूंना स्पर्धेची तयारी करण्यासाठीही मदत होते. दरवर्षी महापौरांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर ते मार्च काळात या स्पर्धा होतात. मात्र, २०२० मध्ये करोनामुळे २०२१ पर्यंत या स्पर्धा रद्द होत्या. तर, २०२२ मध्ये प्रशासक नियुक्त झाल्याने तसेच महापौर नसल्याने महापालिकेने या स्पर्धाच रद्द केल्या आहेत.
“शहराचे स्वतंत्र क्रीडा धोरण आहे. त्यामुळे या स्पर्धा दरवर्षी होणे अपेक्षित आहे. महापौर चषक स्पर्धेचे नाव आहे, मात्र खर्च महापालिका प्रशासच करते. त्यामुळे खेळाडूंसाठी या स्पर्धा गरजेच्या आहेत. प्रशासनाने त्याचा सकारात्मक विचार करावा.” – अनिल टिंगरे, माजी अध्यक्ष, क्रीडा समिती
“महापालिकेने तातडीने स्पर्धा घ्याव्यात. लोकप्रतिनिधी असो, वा नसो महापालिकेने या स्पर्धा घेणे आवश्यक आहे. क्रीडा धोरणातही तशी स्पष्ट तरतूद आहे. शहरात खेळाडूंसाठी सुविधा आहेत. मात्र, त्यांना स्पर्धात्मक वातावरण मिळत नाही, ही दुर्देवाची बाब आहे.” – अविनाश बागवे, माजी अध्यक्ष, क्रीडा समिती
“महापालिकेचा प्रशासकीय कारभार नियमित सुरू आहे. मग, खेळाडूंच्या स्पर्धा घेण्यात काहीच अडचण नाही. स्पर्धेच्या नावाबाबत आक्षेप असेल, तर आयुक्तांनी या स्पर्धा महापालिका चषक म्हणून घ्याव्यात. खेळाडूंचे नुकसान करू नये.” – अभिजित भोसले, वरिष्ठ प्रशिक्षक, मल्लखांब
“गेली चार वर्षे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. स्पर्धा घेण्यासाठी आम्ही सर्व क्रीडा शिक्षक तयार आहोत. पण, महापालिकेने लोकप्रतिनिधींंचे कारण देत खेळाडूंचे नुकसान करू नये.” – हर्षल निकम, प्रशिक्षक, धावणे