पुणे – महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळेतील आणि महापालिका हद्दीतील अंध शाळांतील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत क्रमिक पाठ्यपुस्तके देण्याला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.
मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. एकूण 94 हजार 554 पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाची 47 हजार 787, उर्दू माध्यमाची 12 हजार 242 पुस्तके आणि इंग्रजी माध्यमाच्या 34 हजार 525 पुस्तकांचा समावेश असल्याचे रासने यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून पुणे महापालिका हद्दीतील रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत विनामूल्य पुस्तके दिली जातात. हे विद्यार्थी दिवसभर नोकरी करून रात्री शिक्षण घेत असतात.
त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. महापालिकेच्या नी. वा. किंकर रात्रशाळा, पूना नाईट स्कूल, शुक्रवार पेठ आणि आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला, सोमवार पेठ या तीन शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत.
रात्रशाळेतील मराठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 3 हजार 632 पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. पुस्तक खरेदीसाठी एकूण 50 लाख 77 हजार रुपये बालभारती संस्थेला अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याचे रासने यांनी नमूद केले.