पुणे -करोना संसर्ग अजून पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे अजूनही अनेक सुविधा पूर्णत: बंद आहेत. तर, काहींसाठी ठराविक वेळ निश्चित आहे. मात्र, आता पालिकेने आणखी काही घटकांसाठीचे निर्बंध शिथिल केले आहेत.
मात्र, या सोयींचा लाभ घेणाऱ्यांना करोना लसींचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याची सुरूवात शहरात इनडोअर क्रीडा संकूल, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रापासून करण्यात आली आहे.
आठवड्याचे सातही दिवस मैदाने तसेच इनडोअर क्रीडा संकूल सकाळी 7 ते 4 या वेळेत सुरू असणार आहेत. शिवाय शहरातील स्पर्धा परीक्षांचे क्लासेसही 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे.
तर, इनडोअर क्रीडा संकुलाचा वापर करण्साठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षक तसेच प्रशिक्षणार्थींनी करोना लसीचा एक डोस घेतला असणे बंधनकारक आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शुक्रवारच्या साप्ताहिक आढावा बैठकीनंतर हे सुधारित आदेश मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी काढले आहेत. सोमवारपासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.