पुणे – शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची सतत्याने हजेरी लागत आहे. शनिवारी (दि.19) देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. रविवारपासून मात्र पावसाच प्रभाव कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, दक्षिण कोकण किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत वातावरणाची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
परिणामी गुरुवारपासून (दि.19) बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकण भागात येत्या 20 जूनपर्यंत पाऊस कायम राहणार असला, तरी मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे.
दरम्यान, शहरात शनिवारी अधून-मधून पावसाची जोरदार सर पडत होती. त्यामुळे दिवसभर सुरू असलेल्या रिपरिपीमुळे शहर परिसरातील बहुतांश भागांत पाणी साचले. तर काही ठिकाणी रस्ते निसरडे होणे, वाहतूक संथ होणे, पाणी साचणे यासारखे प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.
विभागाच्या नोंदीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे 7 मिमी तर लोहगाव येथे 12 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. महाबळेश्वर येथे सर्वाधिक 51 मिमी पाऊस, तर सर्वात कमी 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.