पुणे – महापालिकेकडून मिळकतकर विभागाच्या थकबाकी वसुलीसाठी 30 अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे, करवसुलीस काही प्रमाणात वेग येणार आहे. करसंकलन विभागाकडून या कामासाठी सुमारे 100 ते 150 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुका तसेच इतर विभागांच्या प्रशासकीय कामामुळे कर्मचारी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने या विभागास उत्पन्नवाढीसाठी या कर्मचाऱ्यांचाच आधार असणार आहे.
आयुक्तांच्या अंदाजपत्रकात कर संकलन विभागास सुमारे 2500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात केवळ 1450 कोटींचा महसूल मिळालेला आहे. त्यामुळे 31 मार्चअखेरपर्यंत या विभागास जवळपास हजार कोटींची वसुली करायची आहे. या शिवाय, पूर्वीच्या थकबाकीचेही काम आहे. असे असतानाच; महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये या विभागाचे सुमारे 120 कर्मचारी बदलण्यात आल्याने मिळकतकर वसुलीचे काम ठप्प झाले होते.
त्यानंतर या विभागाने वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी 30 अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. विविध क्षेत्रीय कार्यालय आणि 1 ते 5 परिमंडळमधील हे कर्मचारी आहेत. मात्र, यांची नियुक्ती ही 31 मार्चपर्यंतच असणार आहे.