‘एमएसआरडीसी’कडून होणार पश्चिमकडील रस्त्याचे काम
– गणेश आंग्रे
पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोड प्रत्यक्षात उभारण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या रिंगरोडची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. एमएसआरडीसीच्या कळवडे (ता.भोर) ते उर्से (ता. मावळ) या 68 किलोमीटर लांबीचा पश्चिम रिंगरोडमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच या रिंगरोडला राज्य सरकारकडून “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा दिला आहे. तसेच, हा रिंगरोड करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य शासनाने एमएसआरडीसीची नियुक्ती केली आहे.
रस्त्यासाठी भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारच्या मदतीने उभारता येणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी यापूर्वी चार पर्याय निवडण्यात आले होते. मात्र, हे सर्व पर्याय बाजूला ठेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे.
रिंगरोडची प्रमुख वैशिष्ट्ये…
– केळवडे (ता.भोर) पासून उर्से (ता. मावळ) येथे समाप्त.
– पश्चिम रिंगरोडची लांबी 68 किलोमीटर
– रिंगरोड सहा पदरी आणि 8 बोगदे
– खडकवासला बॅकवॉटरवरून मोठा पूल
– एकूण छोटे पूल – 3, उड्डाणपूल – 2
– रिंगरोडवरून प्रतिदिन 60 हजार वाहने धावतील
– न्यू मार्गावर जाण्यासाठी सहा ठिकाणी इंटरचेंज
– रिंगरोडसाठी सुमारे 750 हेक्टर जागेची आवश्यकता
– प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 10 हजार कोटी रुपये
असा असणार रिंगरोड…
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी-धामणे- बेबडओहोळ-चांदखेड-पाचाणे (ता.मावळ) – पिंपळोली- केमसेवाडी -जवळ- पडळघरवाडी- रिहे – मातेरेवाडी – घोटावडे – अंबडवेट- भरे – कासारआंबोली – उरावडे – आंबेगाव – मारणेवाडी – मोरेवाडी – भरेकरवाडी – कातवडी (ता. मुळशी) – बहुली- भगतवाडी -सांगरुण – मांडवी बुद्रुक – मालखेड – वरदाडे – खामगाव मावळ – घेरा सिंहगड – मोरदरवाडी – कल्याण – रहाटावडे (ता. हवेली) – रांजे- कुसगाव -खोपी- कांजळे- केळवडे (ता. भोर) येथील पुणे -सातारा महामार्गाला जोडला जाणार आहे.