पुणे – शहरात अनावश्यक कामांवर कोट्यवधींची उधळपट्टी करणाऱ्या महापालिका प्रशासनाने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी आता थेट शहरातील सोसायट्यांना टार्गेट केले आहे. सोसायटीमधील एखाद्या मिळकतधारकाने कर भरलेला नसल्यास त्याला कर भरण्याच्या सूचना कराव्यात तसेच कर भरण्यास भाग पाडावे अन्यथा संपूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा कर संकलन विभागाने शहरातील अनेक सोसायट्यांना बजाविल्या आहेत. एक-ृदोन थकबाकीदारांसाठी सोसायटीत वर्षानुवर्षे नियमित कर भरणाऱ्या करदात्यांचे पाणी महापालिका कोणत्या अधिकारात तोडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालिकेने करदात्याची मिळकत सील करावी त्यावर इतर कायदेशीर कारवाई करावी; पण सोसायटीला वेठीस धरू नये, अशी मागणी केली जात आहे.
कोंढवा येथील टिळेकरनगरमधील आकृती हब टाऊन कंट्रीवूड या सोसायटीस महापालिकेच्या कर संकलन विभागाने अशीच नोटीस बजाविली असून, सोसायटीमधील 8 मिळकतींचा सुमारे 3 लाख 36 हजार 276 रुपयांचा कर थकीत असून, तो कर भरला न गेल्यास नोटीस दिल्यानंतर दोन दिवसांत कर न भरल्यास सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित करणे, सोसायटीला देण्यात आलेली सौरऊर्जेची सवलत रद्द करणे, तसेच सोसायटीच्या क्लब हाऊस, स्विमिंग पूल तसेच इतर सुविधा सील केल्या जातील, असा धमकीवजा इशाराच देण्यात आला आहे. त्यामुळे जर 100 घरांच्या सोसायटीत केवळ आठ जणांनी कर भरला नाही म्हणून महापालिका 92 घरांचा पाणीपुरवठा खंडित करून प्रामाणिक करादात्यांना वेठीस का धरणार, असा सवाल सोसयाटीमधील नागरिक करत आहेत.
निवासी मिळकतधारकांकडे मोठी थकबाकी
महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी 10 हजार कोटींच्या वर
निवासी मिळकतींची थकबाकी मोठ्या प्रमाणात
गेल्या पाच वर्षांत थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबवूनही अनेक निवासी मिळकतींचा कर भरला जात नाही.
त्यामुळे महापालिकेच्या कर संकलन विभागाने या थकबाकीदारांनी कर भरावा, यासाठी थेट सोसायट्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
हा महापालिकेचा सरळ सरळ आचरटपणा आहे. प्रत्येक मिळकत स्वतंत्र आहे. अशा प्रकारे सोसायटीला नोटीस देता येत नाही. हे पूर्णत: बेकायदेशीर असून, असा अधिकारच महापालिकेस नाही. त्यामुळे महापालिकेने या नोटीसा थांबविणे गरजेचे आहे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच
या सोसायटील माझे घर आहे. मी नियमित कर भरतो, जे थकबाकीदार आहेत, त्यांचा कर पालिकेने वसूल करणे योग्यच आहे. पण, महापालिका थकबाकीदारांसाठी आम्हला वेठीस धरत असून, सोसायटीला नोटीस बजाविण्यात आली आहे. महापालिकेने संबधित मिळकतधारकावर कारवाई करावी, माझे पाणी तसेच माझ्या सुविधा कोणत्या कायद्याच्या आधारे महापालिका थांबवणार हे स्पष्ट करावे. हा सर्व उफरटा कारभार असून प्रामाणिक करादात्यांवर हा अन्याय आहे.
– संजय शितोळे, सदस्य, आकृती हब टाऊन कंट्रीवूड सोसयाटी
थकबाकीदारांची माहिती संबंधित सोसायटीला कळविण्यात आली आहे. तसेच थकबाकीदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. यापूर्वीही महापालिकेकडून अशा नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
– अजित देशमुख, उपायुक्त, कर संकलन विभाग