पुणे : महिलेचा चोरून पाठलाग केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा सत्र न्यायाधीश आर.आर. मेंढे यांनी रद्द केली. मल्हारी पांडुरंग वाघमारे असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. विराज बिपीन पाटोळे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १ महिना सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच, दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसाचा कालावधी भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. ही शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे.
वाघमारे याच्यावर १७ मार्च २०१७ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन येथे महिलेच्या फिर्यादीनुसार विनयभंग़ाचा गुन्हा दाखल केला होता. ११ ते १७ मार्च या कलावधीत महिलेचा पाठलाग केल्याचे म्हटले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाने तीन साक्षीदार तपासले होते. साक्षी पुराव्यावरून त्याला शिक्षा सुनावण्यात आली. याविरोधात सत्र न्यायालयात अपील केले होते.
आरोपीने वारंवार पाठलाग करत फिर्यादीशीं संपर्क केल्याचे सिध्द झाले नाही. फिर्यादी व इतराच्या साक्षीवरून कलम ३५४ ची पूर्तता होत नाही. तसेच एका साक्षीदाराने घटनेच्या वेळी आरोपीला प्रत्यक्ष पाहिले नसल्याचे म्हटले आहे. यावरून शिक्षा चुकीची असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे विराज बिपीन पाटोळे यांनी केला.