पुणे – इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करताना शाळांना मोठी कसरतच करावी लागणार आहे. विविध अंतर्गत मूल्यमापनास विद्यार्थी अनुपस्थित असल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाइन व इतर प्रक्रियेद्वारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन आवश्यक नोंदी घ्याव्या लागणार आहेत.
शिक्षकांनी व्हॉट्स ऍप बेस मूल्यमापन, कृतिपत्रिका, गृहकार्य, स्वाध्याय, सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा आदी विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केलेले आहे. मात्र, काही विद्यार्थी यात उपस्थित राहिले नाहीत व त्यांनी काही परीक्षांचे कामकाज पूर्ण केलेले नाही, अशा प्रकारचे विद्यार्थी आढळणार आहेत.
शाळांच्या सराव चाचण्या, प्रथम सत्र, सराव परीक्षा अथवा इतर अंतर्गत मूल्यमापनासाठी अनुपस्थित असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांसाठी शाळांनी ऑनलाइन, दूरध्वनीद्वारे व तत्सम प्रक्रियेद्वारे एकास एक पद्धतीने वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे लागणार आहे.
पुढील दोन परीक्षांच्या संधी
मार्च 2020 मध्ये सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मधील परीक्षेत प्रथम संधी उपलब्ध होती. आता यानंतर मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रथम परीक्षेची आणखी एक संधी अशा विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. नोव्हेंबर- डिसेंबर 2020 मध्ये सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल-मे 2021 मधील परीक्षेत प्रथम संधी उपलब्ध होती.
मात्र, ही परीक्षा रद्द झाल्याने आता यानंतर मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या लगतच्या पुढील दोन परीक्षांच्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे या संबंधित श्रेणी सुधारच्या विद्यार्थ्यांचे निकाल सध्या तयार करण्यात येणार नाही, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.