पुणे – परदेशात नोकरीच्या आमिषाने एकाची दोन लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कोथरुड भागात राहायला असून, ते खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता.
ऑस्ट्रेलियातील वित्त विभागात नोकरीची संधी असल्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर परदेशातील नोकरीसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख नऊ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. त्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तपास करत आहेत.