पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी विविध संघटनांच्या वादातून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांसाठी प्रस्तावित नियमावली तयारी केली आहे. विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी येत्या ८ जानेवारी रोजी चर्चा करुन ही नियमावली अंतिम करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी संघटनांना विद्यापीठाने निश्चित केलेल्या नियमावलीला अनुसरुन पावले उचलावी लागणार आहे.
विद्यार्थी संघटनांमुळे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यापीठ आवारात पहिल्यादांच पोलिसांनी १४४ कलम लागू केले. त्याचप्रमाणे विद्यापीठात आंदोलन करण्यासाठी नियमावली तयार करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाने सध्या प्रस्तावित नियमावली तयार केली आहे. त्यात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांना आंदोलन करायचे असेल तर पाच दिवस आधी त्याची पूर्वसूचना द्यावी लागेल, विद्यापीठ प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आंदोलनाची परवानगी घ्यावी लागेल.
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित संघटना त्यास जबाबदार राहील. तसेच आंदोलनामुळे विद्यापीठाच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, त्याचप्रमाणे आंदोलनाबाबत संबंधितांकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल, अशी प्रस्तावित नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
आठ जानेवारीला बैठक
विद्यापीठाने जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थी संघटनांबरोबर नियमावली बाबत चर्चा केली जाणार आहे. याबाबत विद्यापीठाने येत्या 8 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीस संबंधित संघटनेचे अध्यक्ष व सचिव या दोघांना बोलवले जाणार आहे. त्यानंतर नियमावलीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.