पुणे -‘आरटीई’ प्रवेशासाठी आज लॉटरी काढणार

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’ च्या 25 टक्के प्रवेशासाठी सोमवारी संगणकाद्वारे लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाची उत्सुकता लागली आहे.

राज्यातील 9 हजार 195 शाळांनी 1 लाख 16 हजार 865 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. या प्रवेशाच्या जागांपेक्षा दुप्पटीने म्हणजेच 2 लाख 44 हजार 951 अर्ज पालकांनी पोर्टलवर दाखल केले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रवेश निश्‍चित करण्यासाठी संगणकाद्वारे आझम कॅम्पसमधील उर्दु मुलांची शाळा येथे सकाळी साडेअकरा वाजता लॉटरी पध्दत राबविण्यात येणार आहे. या पहिल्या लॉटरीनंतरही प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्यास दुसऱ्यांदा लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरी काढल्यानंतर पालकांना प्रवेशासाठी मुदत देण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी ऑनलाईनद्वारे 2 लाख 44 हजार 11 अर्ज दाखल झाले आहेत. मोबाइल ऍपद्वारे 940 अर्ज दाखल झाले आहेत. यावरुन ऑनलाइनद्वारे अर्ज भरण्याला प्राधान्य देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 53 हजार 676 अर्ज दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी नंदुरबारमधून 573 अर्ज दाखल झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.