पुणे, दि. 17 -महामेट्रो आणि महापालिकेकडून नदीपात्रात सुरू असलेल्या कामांमुळे शहराच्या मध्यवर्ती पेठांमधून कोथरूड, कर्वेनगरकडे जाणारा नदीपात्रातील रस्ता बंद आहे. परिणामी, या रस्त्यावरून दररोज जाणारी तीन ते चार लाख वाहने टिळक चौक, डेक्कन चौक, गांजवे चौक तसेच गरवारे चौकातून जात असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात पुन्हा वाहतूक कोंडीला सुरुवात झाली असून, सकाळी आणि संध्याकाळी दररोज कोंडी होत आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांनी तातडीने आपली कामे संपवून रस्ता खुला करून देण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागातून दररोज लाखो दुचाकी भिडे पुलावरून नदीपात्रातील रस्त्याने पुढे मेंहदळे गॅरेज चौकात जातात. तिथून ही वाहने कर्वेनगर, कोथरूड, डीपी रस्त्याने राजाराम पुलाकडे जातात. पहाटे पाचपासून रात्री उशीरपर्यंत या रस्त्यावर दुचाकींची मोठी वर्दळ असते. मात्र, महापालिकेने यंदाच्या पावसाळ्यात राजपूत झोपडपट्टी येथे ड्रेनेजचे पाणी घरांमध्ये घुसल्याने मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. तर या ठिकाणी रस्ताही रूंद करण्यात येणार आहे. त्यासाठी दिवाळी संपताच हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या लाखो दुचाकी शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यासाठी तसेच पूर्वेच्या दिशेला जाण्यासाठी कर्वे रस्त्याने डेक्कन येथे येऊन पुढे अलका चौकातून जात आहेत. तर सेनादत्त पोलीस चौकी, गरवारे महाविद्यालयापासून एस. एम. जोशी पूल आणि पुढे गांजवे चौकातून टिळक रस्ता तसेच शास्त्री रस्त्याने पुढे जात आहेत. त्यामुळे डेक्कन, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता या प्रमुख रस्त्यांवर पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
मेट्रोच्या कामाचाही फटका
महामेट्रोकडून डेक्कन बसस्थानकासमोरून भिडे पुलाकडे येणारा रस्ता मेट्रो स्थानकानाला जोडणाऱ्या प्रवेशद्वाराच्या कामासाठी बंद केला आहे. हे प्रवेशद्बार जंगली महाराज रस्त्यावर आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, भांडारकर रस्त्यावरून भिडे पुलाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ही वाहने डेक्कन चौकातून अलका चौकात येतात. तिथून ती केळकर रस्त्याने पुढे नदीपात्रात जात आहेत. त्यामुळे डेक्कन चौकात आणि अलका चौकात वाहनांची संख्या वाढल्याने सिंग्नल यंत्रणाही कोलमडून पडत असून, त्याचा ताण अलका चौकाला जोडणाऱ्या रस्त्यांवर येऊन कोंडीत भर पडत आहे.