पुणे – शहराच्या सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मेट्रो सेवा पुणेकरांना आवडल्याचे चित्र आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल 40 हजार 690 पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास केला. मेट्रोच्या प्रवाशांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील दैनंदिन नोकरीसाठी दोन्ही शहरांत ये- जा करणारे नागरिक तसेच महिलांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी मेट्रोच्या विस्तारीत सेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी 5 पासून मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत ही सेवा सुरू होती. यात त्यात वनाज ते रुबीहॉल मार्गावर 7 हजार 456 आणि सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मनपा मार्गावर 5,462 जणांनी प्रवास केला आहे. बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत या दोन्ही मार्गांवर सुमारे 27 हजार 772 जणांनी प्रवास केला आहे. त्यात वनाज ते रुबीहॉल मार्गावर सुमारे 17 हजार 917 तर सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मार्गावर 9 हजार 855 जणांनी प्रवास केला आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मेट्रोच्या प्रवाशांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाल्याचे चित्र आहे.
मेट्रोमुळे पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक पर्याय निर्माण झाला आहे. याशिवाय मेट्रोमुळे सुरक्षित तसेच कोंडीमुक्त प्रवासाची अनुभूती मिळत आहे. वनाज ते रुबीहॉल मार्गावर स्वत:चे वाहन अथवा पीएमपीने जायचे झाल्यास वाहतूक कोंडीत जवळपास एक ते सव्वा तास लागतो. मात्र, मेट्रोमुळे वेळेची बचत होत आहे.
मेट्रोचे प्रवासी
- दि. 1 ऑगस्ट : 12,918
- दि. 2 ऑगस्ट : 27,772
(रात्री 8 वाजेपर्यंत) - ट्रेनची वारंवारिता गर्दीच्या वेळी-
- दर 10 मिनिटांनी
- अन्य वेळी :
दर 15 मिनिटांनी
- मेट्राचे मार्ग आणि प्रवासाचा वेळ
1. वनाज ते रुबी हॉल : 20 मिनिटे
2. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी : 25 मिनिटे - मेट्रोने प्रवास करण्याचे फायदे…
- शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, मनपा, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, डेक्कन इत्यादी महत्त्वाच्या भागांना सहजतेने जाता येणार.
- प्रवासाच्या वेळेमध्ये जवळपास 50 टक्के घट.
- शहरातील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार
- पुणे रेल्वे स्थानक व शिवाजीनगर येथे रेल्वे स्थानकात थेट उतरता येणार.
- डेक्कन, शिवाजीनगर आणि मनपा येथे पीएमपी स्थानकावर उतरता येणार.