पुणे – नवले पुलावर वारंवार होणारे अपघात तसेच महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर होणारे अपघात आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात महापालिकेत सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील, याविषयी येत्या आठ दिवसांत अहवाल सादर करावा आणि त्याचे सादरीकरण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर आणि उपमहापौर सुनीता वाडेकर उपस्थित होते.
नवले पुलावर गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातानंतर उपाययोजनांसंदर्भात बैठक घेऊ, असे मोहोळ यांनी सांगितले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृहनेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहणारे धनंजय देशपांडे, मेट्रोचे अतुल गाडगीळ आदी उपस्थित होते.
नवले पुलावर आजपर्यंत झालेल्या अपघातांत 42 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या पुलावर वारंवार हे प्रकार होत आहेत. बोगद्यापासून वडगापर्यंत सहा ठिकाणे अशी आहेत जेथे वारंवार अपघात होतात. त्यामुळे उपाययोजना काय केल्या पाहिजेत यावर चर्चा करण्यासाठी ही तातडीची बैठक बोलावण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
दोन्ही पुलावरील तीव्र उतार कसे कमी करता येतील, भूमकर चौक किंवा वडगावचे विश्वास हॉटेल चौक तेथे होणारे अपघात असतील, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येतील, बोगद्यापासून ते वडगावपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी जे पंक्चर्स आहेत त्यावर काय उपाय करता येतील, तेथे धोरण काय करावे, स्मशानभूमीची जागा आहे त्यांना पर्यायी जागा कोठे देता येईल का, यावर चर्चा झाल्याचे मोहोळ यांनी नमूद केले. त्या पट्ट्यात सीसीटीव्ही लावून, स्पीडगन लावता येईल का. तसेच या रस्त्यांवरील लेनमधून वाहने सुरळीत कशी जातील, लेन तोडल्यावर दंडात्मक कारवाई करता येईल का, यावर चर्चा झाली.
महापालिकेचे अधिकारी आणि महामार्गाचे ऑथॉरिटी यांनी एकत्रित विचार करून यावर आठ दिवसांत अहवाल तयार करावा. कायमस्वरूपी उपाययोजना असतील आणि त्यात खर्च असेल तर त्याचाही डीपीआर तयार करावा. त्यामध्ये महापालिकेने आणि महामार्गानेही काय करावे, अंदाजित खर्च काय असेल हेदेखील नमूद करावे, असे त्यांना सांगण्यात आले. हा अहवाल तयार झाल्यावर तो गडकरींपुढे सादर करून त्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे, मोहोळ म्हणाले.
..तर भविष्यातील मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा
सिंहगड रस्त्यावरील नियोजित उड्डाणपूलाच्या भूमिपूजनाला आल्यावर गडकरींनी वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने पुलांची रचना कशी असावी यासंदर्भात भाषणात सांगितले होते. त्यामुळे या पुलाचे ठेकेदार, सल्लागार, आणि ज्यांनी त्याचे डिझाइन केले आहे ते आर्किटेक्ट, महापालिकेतील अधिकारी या सगळ्यांची एक बैठक महापालिकेत झाली. वाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी डबलडेकर पूल करता येईल का, किंवा आणखी काय उपाय करता येतील याचा अभ्यास करून त्याचे सादरीकरण करावे, असे त्यांना सांगण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले. यासाठी खर्च वाढला तरी चालेल परंतु वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, आणि हे तयार करताना भविष्यातील मेट्रो मार्गाचाही विचार करावा, असेही अधिकाऱ्यांना सांगितल्याचे मोहोळ म्हणाले.