पुणे : दिवसाआड पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या पुणेकरांसाठी मान्सूनच्या सरी आनंदवार्ता घेऊन आल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासाखळीच्या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली आहे.
पावसाचे प्रमाण कमी असले तरी 25 ते 27 जून या कालावधीत पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक 32 मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
शनिवारी सकाळपासून शहरात हजेरी लावलेल्या मान्सूनने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कमी असून अधून मधून पावसाच्या मोठया सरी येत आहेत. मात्र, त्याच वेळी आसपासच्या डोंगररांगांमध्ये पावसाला चांगली सुरूवात झाली असून छोटे पाण्याचे प्रवाह धरणात येण्यास सुरूवात झाली आहे.
हे पाणी अगदीच नगण्य असले तरी, तापलेल्या जमीनीत ते मुरण्यास मदत होणार असल्याने नंतर पावसाचे पाणी धरणात साठण्यास सुरूवात होणार आहे. पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,
शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी 5 पर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 32 मिमी, पानशेत 10 मिमी, वरसगाव 14 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.