पुणे – ग्रामीणमध्ये जून आणि जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक 106 टक्के तर जुलै महिन्यात 93 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, ऑगस्ट महिना निम्मा संपला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या महिन्याच्या सरासरीपेक्षा केवळ 19 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात ग्रामीणमध्ये (एकूण 13 तालुके) सरासरी 176 मिमी पाऊस पडतो. मात्र, या महिन्यात सरासरीपेक्षा 186 मिमी अधिक पावसाची नोंद झाली. त्यामध्ये भोर, मावळ, खेड, शिरूर, दौंड, आंबेगाव या तालुक्यात तब्बल 130 ते 153 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर हवेली तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात सरासरी 309 मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत 287 मिमी पाऊस झाला.