पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवकांची मुदत संपण्यास 25 दिवस शिल्लक आहेत. त्यात सर्वपक्षीय नगरसेवकांची प्रभागातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी लगबग सुरू असून, शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत तब्बल 86 उद्घाटनांच्या कार्यक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.
ही उद्घाटने पुढील काही दिवसांत होणार आहेत. तर, प्रभागांमध्ये प्रकल्पांना नाव देण्यासह वेगवेगळी शिल्पे उभारण्यासाठीचे सुमारे 30 ते 40 प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. नगरसेवकांच्या पदाची मुदत 14 मार्चला संपत आहे. त्यातच, पहिल्यांदाच नगरसेवकांना शेवटच्या वर्षात कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
त्यामुळे प्रभागात आपली कामे दाखविण्यासाठी नगरसेवकांची लगबग सुरू आहे. त्याचीच प्रचिती शुक्रवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत आली. यात सुमारे दीडशेपेक्षा अधिक प्रस्ताव होते. त्यात तब्बल 86 प्रस्ताव उद्घाटनांचे होते. ते मान्य करून लगेचच मुख्यसभेत पाठविण्यात आले. त्यानंतर मुख्यसभेतही सर्वपक्षीय नेत्यांनी अवघ्या काही सेंकदांत हे प्रस्ताव तातडीने मान्य केले.