पुणे – पुण्यात एच.पी. सॅमसंग, कॅनन व इफसन व डिस्ने कंपनीचे बनावट पार्ट तयार करणारे रॅकेट गुन्हे शाखा एकच्या पथकाने उध्वस्त केले. याप्रकरणात कॉपीराईटचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार पेठ मधील आण्णासाहेब खैरेपथ येथे प्रविण खोड (वय-28 वर्ष, रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे) यांचे दुकानात छापा टाकला असता, सदर दुकानात सॅमसंग, कॅनन व इफसन कंपनीचे बनावट टोनर , कार्टेज ,आउटर बॉक्स ,पॅक इंक बॉटल, होलोग्राम यांचे बनावटीकरण केलेले पार्ट व साहित्य मिळुन आले आहे.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आरोपीकडुन एकुण 25 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उप-निरीक्षक एस कुलकर्णी हे करीत आहेत. 6 जुलै रोजी आलेल्या तक्रार अर्जावरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सैय्यद व युनिट एकच्या पथकाने मिळुन तृप्ती ट्रेडर्स , प्रेम टॉईज , गणेश ट्रेडर्स, रविवार पेठ, पुणे येथील दुकानांवर छापा टाकला असता तिन्ही दुकानांतून बनावट डिस्ने कंपनीची खेळणी व शालेय साहित्य असा दोन लाख 94 हजार रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल जप्त केलेला आहे.
त्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार विठ्ठल पाटील, अमोल पवार, निलेश साबळे, अभिनव लडकत, शशीकात दरेकर, यांनी केली आहे.